पराक्रमी अजिंक्य योद्धा बाजीराव कायमच दुर्लक्षित – जगन्नाथ लडकत

Share this News

निगडी / पुणे दि.३ (सिटीनामा वृत्तसेवा)
‘केवळ ब्राह्मण जातीतील असल्याने अजिंक्य योद्धा बाजीराव यांचा पराक्रम दुर्लक्षित केला गेला’ अशी खंत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे शनिवार, दि. ०२ मे २०२६ रोजी व्यक्त केली. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आयोजित तीन दिवसीय छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमालेत ‘अजिंक्य योद्धा बाजीराव आणि पालखेडची लढाई’ या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना जगन्नाथ लडकत बोलत होते.निगडी येथील सावरकर मंडळ व्याख्यानमालेचे हे सलग ४२ वर्ष आहे. प्राचार्य भाऊसाहेब जाधव, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे, सचिव ॲड. हर्षदा पोरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य भाऊसाहेब जाधव यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे सर्व उपक्रम अतिशय स्तुत्य आहेत, असे गौरवोद्गार काढले.

जगन्नाथ लडकत पुढे म्हणाले की, ‘गोरापान, तरणाबांड, डौलदार चालीचा, सहा फूट उंचीचा, अजानुबाहू बाजीराव हे तेजस्वी व्यक्तिमत्त्व होते. फक्त चाळीस वर्षांचे आयुष्य लाभलेल्या बाजीराव यांनी वीस वर्षे पेशवेपदाची धुरा सांभाळून चाळीस लढाया केल्या; आणि एकदाही पराभव त्यांच्या वाट्याला आला नाही. जगातील सर्वोत्तम दहा लढायांमध्ये बाजीराव यांनी लढलेल्या पालखेडच्या लढाईचा समावेश केला जातो. छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करण्यात बाजीराव यांचा सिंहाचा वाटा आहे. देशभरातील शत्रूंमध्ये बाजीराव यांच्या पराक्रमाची प्रचंड दहशत होती. ब्रिटिश इतिहासकार फील्ड मार्शल मान्टगोमेरी यांनी हे नमूद केल्यामुळे जगाला कळले; अन्यथा त्यांच्या शौर्याचा इतिहास दडवून ठेवण्यात आला होता. आपण इस्त्रायलमधील मोसाद या गुप्तचर संघटेनेचे गोडवे गातो; परंतु बाजीराव यांचे गुप्तहेर खाते मोसादपेक्षाही सक्षम होते. २८ फेब्रुवारी १७२८ रोजी हैदराबादच्या निजाम – उल – मुल्क याच्या बलाढ्य सैन्याविरोधात वेगवान हालचाली करीत पालखेड येथे जे युद्ध जिंकून ०६ मार्च १७२८ रोजी मुंगी शेवगाव येथे त्याला जो तह करायला भाग पाडले, ते जगातील सर्वोत्कृष्ट गनिमी काव्याचे उदाहरण मानले जाते.

बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल याच्या विनवणीवरून बाजीराव यांनी त्याला मोहम्मद खान बंगश याच्या तावडीतून सोडवून त्याला पुन्हा राजगादीवर बसवले. तेव्हा त्याची कन्या मस्तानी हिच्याशी बाजीराव यांचा विवाह त्याने करून दिला. मस्तानी ही प्रणामी पंथातली असून ती कृष्णभक्त होती आणि पूर्ण शाकाहारी होती. २८ एप्रिल १७४० रोजी रावेरखेडी येथे बाजीराव यांचे निधन झाल्याचे वृत्त समजताच मस्तानीने प्राणत्याग केला. अजिंक्य योद्धा बाजीराव पेशवे यांचा जाज्वल्य इतिहास नवीन पिढीला सांगितला पाहिजे!’ असे आवाहन जगन्नाथ लडकत यांनी केले.

भूषण डोंगरे आणि उज्ज्वला केळकर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. प्रिया जोग यांनी सूत्रसंचालन केले. शैलेश भिडे यांनी आभार मानले. संपूर्ण वंदेमातरम् ने समारोप करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *