श्री हनुमान यांचे व्यक्तिमत्त्व पंचकोशांच्या दृष्टीने पाहिले, तर एक अद्वितीय, प्रेरणादायी आणि सर्वांगसुंदर आदर्श आपल्या समोर उभा राहतो. ते केवळ अतुलनीय बलशाली नव्हते, तर शरीर, प्राण, मन, बुद्धी आणि आत्मभान या सर्व स्तरांवर परिपूर्ण संतुलन साधणारे होते.
अन्नमय कोशाच्या दृष्टीने हनुमान म्हणजे सुदृढ, सबल आणि कार्यक्षम शरीराची मूर्तीच. रामायण मध्ये त्यांच्या शारीरिक सामर्थ्याचे असंख्य प्रसंग दिसून येतात. अशोकवाटिकेत राक्षसांचा पराभव, लंकेपर्यंत एका उडीत समुद्र ओलांडणे, तसेच लक्ष्मणाच्या प्राणरक्षणासाठी द्रोणगिरी पर्वत उचलून आणणे..ही त्यांच्या देहबळाची सर्वोच्च उदाहरणे होत. म्हणूनच व्यायामशाळांमध्ये महाबळी हनुमानाची उपासना केली जाते आणि समर्थ रामदास यांनीही बलोपासनेसाठी हनुमानाचीच निवड केली. यावरून अन्नमय कोश विकास म्हणजे शरीरसामर्थ्य, सहनशक्ती आणि कार्यक्षमता …आणि त्याचे मूर्तिमंत रूप म्हणजे हनुमान.
प्राणमय कोशा च्या स्तरावर हनुमान म्हणजे ऊर्जा, चपळता आणि गतिमानतेचे जिवंत प्रतीक आहेत. “ चपलांग पाहता मोठे महा विद्दुलते परी ” या वर्णनाप्रमाणे त्यांच्या वेगाची तुलना विजेशी केली जाते. “ मनोजवं मारुततुल्यवेगम् ” या स्तोत्रातील वर्णनाप्रमाणे त्यांच्या गतीला मन आणि वायूशीही तुलना नाही. समुद्र ओलांडताना सुरसा आणि सिंहिका यांसारख्या अडथळ्यांवर त्यांनी अत्यंत चपळतेने मात केली. द्रोणगिरी पर्वत आणून पुन्हा यथास्थानी नेऊन ठेवणे…यातून त्यांच्या वेग, सातत्य आणि प्राणशक्तीचे अद्भुत संतुलन दिसते. युद्धात ते सदैव जागरूक, उत्साही आणि सतेज राहिले. योग्य वेळी योग्य ऊर्जा वापरणे..हीच प्राणमय कोशाची खरी ओळख, आणि त्याचे सर्वोत्तम उदाहरण हनुमानात दिसते.
मनोमय कोशा च्या दृष्टीने हनुमानांचे मन अत्यंत संवेदनशील, करुणामय आणि प्रेमळ आहे. अशोकवाटिकेत सीता यांच्यासमोर उभे राहताना त्यांनी नम्र, संयमी आणि विश्वासार्ह वर्तन केले. त्यांच्या संवादातून आदर, कोमलता आणि सहानुभूती स्पष्ट दिसते. राम यांच्याविषयीची अखंड भक्ती, अहंकाराचा पूर्ण अभाव, आणि विभीषणाच्या मनातील शरणागती ओळखण्याची क्षमता..हे सर्व त्यांच्या निर्मळ, संवेदनशील परंतु स्थिर मना चे द्योतक आहे.
विज्ञानमय कोशा च्या स्तरावर हनुमान “ बुद्धिमतां वरिष्ठम्” ठरतात. लंकेत प्रवेश करताना सूक्ष्म रूप धारण करणे, सीतेला विश्वास देण्यासाठी रामांची मुद्रिका योग्य वेळी दाखवणे, आणि रावण समोर निर्भय पण युक्तीपूर्ण भाषण करणे..ही त्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेची उदाहरणे आहेत. सुग्रीव-राम यांची भेट घडवून आणणे, भरताला रामांच्या आगमनाची वार्ता देऊन अनर्थ टाळणे..या घटनांमधून त्यांच्या निर्णयक्षमता, संवादकौशल्य , बुद्धिमत्ता , चातुर्य आणि रणनीतीचे दर्शन घडते. श्रीरामांचे दूत म्हणून त्यांनी निभावलेली भूमिका ही विज्ञानमय कोशाची परिपूर्ण अभिव्यक्ती आहे.
आणि शेवटी, आनंदमय कोश – हनुमानांचे आत्मभान आणि परमानंद. “ राम काज कीन्हे बिनु, मोहि कहाँ विश्राम ” या भावनेतून त्यांचा कर्मयोग प्रकट होतो. ते स्वतःला रामाचा दास मानतात; परंतु तत्त्वतः “ राम आणि मी एकच” या अद्वैत ज्ञानापर्यंत ते पोहोचलेले आहेत..
देहबुद्ध्या त्वद्दासोऽहं जीवबुद्ध्या त्वदंशकः।
आत्मबुद्ध्या त्वमेवाहम् इति मे निश्चिता मतिः॥
या भावनेतून त्यांचे आत्मज्ञान प्रकट होते. रामाशी एकरूप झालेल्या या अनुभूती तूनच त्यांना नित्य, अखंड आनंद प्राप्त झाला. फलाची अपेक्षा न ठेवता, केवळ सेवाभावाने कार्य करणे..हीच त्यांच्या आनंदमय कोशाची सर्वोच्च अवस्था आहे.
अशा प्रकारे हनुमान म्हणजे पंचकोशांचा संपूर्ण आणि संतुलित विकास..
शरीराने बलवान, प्राणाने ऊर्जावान, मनाने निर्मळ, बुद्धीने प्रखर आणि वृत्तींने आनंदस्वरूप…
म्हणूनच हनुमान हे केवळ पौराणिक व्यक्तिमत्त्व नसून, संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासाचे जिवंत, प्रेरणादायी आणि अनुकरणीय सर्वोच्च मानक ठरतात..!!
✍️नारायण देशपांडे,
पिंपरी चिंचवड
९८२२६५५८६०
