निगडी/ पुणे दि.३० मार्च (सिटीनामा वृत्तसेवा)
जातीपातीत अडकल्यामुळे हिंदू समाज विखुरल्या गेला असून हिंदूंच्या एकतेसाठी पंथभेद विसरून एकत्रित येण्याची वज्रमूठ पूर्णानगर शिवतेजनगर परिसरातील सकल हिंदू बांधव भगिनींनी विराट हिंदू संमेलनाच्या निमित्याने बांधली.

रविवार दि.२९ मार्च रोजी दुपारपासूनच पूर्णानगर शिवतेजनगर परिसरातील विविध भागातून मातृशक्ती, तरुण,लहान मुले, जेष्ठ नागरिक मंगल वेषात मोठ्या संख्येने एकत्रित येण्यास सुरुवात झाली. विविध भागातून भल्या मोठ्या शोभायात्रेने विराट हिंदू संमेलनाचे स्थान असलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय क्रीडा संकुल शनि मंदिर मैदानाच्या दिशेने निघाल्या. डौलात फडकणारे भगवे ध्वज, महापुरुषांचे भले मोठे कट आऊट, ढोल ताशांचा रणभेदी आवाज, टाळ मृदुंगाच्या गजरात रामकृष्ण हरी जयघोष, फुगडी, घालत पारंपारिक युद्धकला,तलवारबाजी, दांडपट्टा, वासुदेव पिंगळा आणि मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर होत सर्वजण मार्गस्थ होत होते. सांस्कृतिक ठेवा जपणाऱ्या या भव्य दिव्य शोभायात्रेने शहरात एक आदर्श घालून दिला.

मैदानात सगळीकडे भगवे वादळ दिसत होते इतकी प्रचंड गर्दी मैदानात झाली होती. हिंदू एकतेच्या शपथेने वातावरण भारावून गेले. व्यासपीठावर सज्जनगड महंत ह.भ.प.अजय बुवा रामदासी, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, व्याख्याते मिलिंद कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.

अजय बुवा रामदासी महाराज यांनी हिंदू आणि हिंदुस्थान या शब्दांचे महत्व विशद केले. हिंदूंनी जाती-पाती, पंथभेद विसरून एकत्र यावे. शत्रू तुम्हाला जात विचारत नाही, तो फक्त तुम्ही हिंदू आहात हेच पाहतो.केवळ घोषणा देऊन काही साध्य होत नाही, तर कृती आवश्यक असून रामाच्या आदर्शांचे अनुकरण केले पाहिजे. सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना धर्म, संस्कृती आणि खरा इतिहास शिकवणे अत्यंत आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी. समाजात वाढत असलेल्या अन्यायाविरोधात संघटितपणे उभे राहण्याची गरज असून आहे.उपासनेची चार अंगांनी (देह, वाणी, मन, बुद्धी) साधना करावी.मंदिर, आश्रम किंवा गोशाळेत सेवा करून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याची गरज “प्रथम आपण हिंदू आहोत, त्यानंतर इतर कोणतीही ओळख आहे.” समाजाचे विघटन करणाऱ्या प्रवृत्तींना ओळखून त्यापासून सावध राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी आपल्या आशीर्वचनपर संबोधनात आपण हिंदू असलो तरी खरंच हिंदू म्हणून जगतोय का? असा प्रश्न विचारून अंतर्मुख केले. आपण आपल्या गौरवशाली देशाचा, धर्माचा, संस्कृतीचा वारसा विसरल्यामुळे आपण विभक्त झालो आहे.
हिंदू धर्म ही केवळ श्रद्धा नसून जीवनपद्धती आहे. नव्या पिढीला महापुरुषांचे ग्रंथ, आपला वारसा, धर्म, संस्कृती समजून सांगणे गरजेचे आहे.
पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव वाढत असून त्यामुळेच वृद्धाश्रमाची संख्या वाढत असल्याची चिंता व्यक्त केली. मातृ पितृ आचार्य भक्ती मुलांना शिकवली पाहिजे.नियमित मुलांनी स्तोत्र पठण केले पाहिजे, सण उत्सवांचा खरा अर्थ समजून घेऊन साजरे केले पाहिजे. कलियुगात संघटनेचे महत्व आहे. अवघा हिंदू एक झाला, संगठित राहिला तर कोणतेही शक्ती आपल्याला हरवू शकणार नाही असा विश्वास त्यांनी दिला.

मिलिंद कांबळे यांनी सामाजिक पंच परिवर्तनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सामाजिक परिवर्तन शक्य असल्याचे सांगितले. मजबूत संस्कारी कुटुंबव्यवस्था हा सशक्त भारताचा पाया असून प्रत्येक कुटुंबाने किमान आठवड्यात एकदा तरी एकत्रित भोजन केले पाहिजे, कुटुंबात सुसंवाद हवा.सावरकरांच्या तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू या भावनेने एक पाणवठा, एक मंदिर एक स्मशान ही संकल्पना प्रत्यक्षात आणून जातीपातीच्या भिंती तोडून समरसता आणण्याचे आवाहन केले. नागरी कर्तव्ये समजावून घेऊन रस्ते नियम पाळणे, स्वच्छता, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करून सजग उत्तम नागरिक म्हणून आपण आपल्या देशाची शान वाढविली पाहिजे. आपल्या संस्कृतीत निसर्गाला ईश्वरस्वरूप मानले आहे आपण पर्यावरण रक्षणाला प्राध्यान्य दिले पाहिजे. असे पाच बिंदू आचरणात आणल्यास समर्थ समाज आणि राष्ट्र उभे राहिला असा विश्वास व्यक्त केला. सूत्रसंचालन राजाराम सावंत यांनी केले. प्रास्ताविक महेंद्र पाटील यांनी तर राजेंद्र कुलकर्णी यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते.
पंचपरिवर्तन बिंदू
सामाजिक समरसता
कुटुंब प्रबोधन
पर्यावरण संरक्षण
‘ स्व’बोध
नागरी कर्तव्ये
