आकुर्डी / पिंपरी चिंचवड (पुणे) दि.१० (सिटीनामा वृत्तसेवा)
जातीपातीच्या भिंती तोडून सकल हिंदूंचे ऐक्य काळाची गरज असल्याचे प्रतिपादन वृक्षदाई संस्थेचे संस्थापक, श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे विश्वस्त ह.भ.प.शिवाजी महाराज मोरे यांनी आकुर्डी येथील केदारेश्वर मंदिर प्रांगणात आयोजित विराट हिंदू संमेलनात केले. सकल हिंदू समाज सेक्टर २४ वस्ती आकुर्डीच्या वतीने विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
सुरुवातीला आकुर्डीतील निळकंठेश्वर मंदिर ते केदारेश्वर मंदिर अशी भव्य शोभायात्रा काढण्यात आली यामध्ये बालगोपाल थोर पुरुषांच्या, संतांच्या वेषभूषेत सहभागी झाले होते. मातृशक्तीचा लक्षणीय सहभाग होता.
ह.भ.प.शिवाजी महाराज मोरे यांनी पुढे बोलतांना भारतीय संस्कृतीची महती, समाज प्रबोधनात सर्व संतांचे महत्वपूर्ण योगदान असल्याचे सांगून समस्त हिंदूंनी आपली जातपात विसरून एकत्रित यायला हवे असेही आग्रहपूर्वक सांगितले.
प्रमुख वक्ते सामाजिक कार्यकर्ते, व्याख्याते नारायण देशपांडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्याने सुरू झालेल्या पंचपरिवर्तनातील स्वबोध, नागरी शिष्टाचार, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरण विषयक मुद्द्यांच्या विषयी सोदाहरण माहिती दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व्यक्तीनिर्माण म्हणजेच माणूस घडविण्याचे काम करीत असून संघाचे स्वयंसेवक सर्व समाजासोबत सेवाकार्यात अग्रेसर असल्याचे सांगितले.
यावेळी उपमहापौर सौ.शर्मिलाताई बाबर, माजी उपमहापौर विद्यमान नगरसेवक सौ.शैलजाताई मोरे, नगरसेवक राजू मिसाळ, नगरसेवक अमित गावडे, डॉ.नितीन गांधी, डॉ.राजीव नगरकर, आनंद देशमुख, किरणराज चोपडा, मदनलाल जैन, प्रकाश जैन, राजेश वर्मा, प्रजापिता ब्रह्मकुमारी च्या नेत्रादिदी, पिल्लई प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ.ज्योती मिलिंद कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाला ७०० पेक्षा अधिक मातृशक्ती, जेष्ठ नागरिक, परिसरातील मान्यवर, बालगोपाल, तरुणाई मोठ्या संख्येने उत्साहात उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वितेसाठी संयोजन समिती सकल हिंदू समाज सेक्टर २४ वस्ती, आकुर्डी यांनी परिश्रम घेतले.
