शहाजी कांबळे लिखित ‘स्वरकथा’ प्रकाशित

Share this News

पिंपरी दि.१ (सिटीनामा वृत्तसेवा)
‘पुस्तक हा आपला सांस्कृतिक ऐवज असतो’ असे विचार ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. स्नेहल तावरे यांनी शनिवार, दि.२८ फेब्रुवारी २०२६ रोजी विरंगुळा केंद्र, पागेच्या तालमीसमोर, चिंचवडगाव येथे व्यक्त केले. शहाजी कांबळे लिखित ‘स्वरकथा’ या कथासंग्रहाचे प्रकाशन करताना प्रा. डॉ. स्नेहल तावरे बोलत होत्या. ज्येष्ठ नागरिक संघ – चिंचवडचे रमेश इनामदार अध्यक्षस्थानी होते; तसेच उपाध्यक्ष गोपाळ भसे, लेखक शहाजी कांबळे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. डॉ. स्नेहल तावरे पुढे म्हणाल्या की, ‘लिहिण्याची प्रेरणा खूप महत्त्वाची असून शहाजी कांबळे यांचे सहज शैलीतील लेखन मनाचा ठाव घेते. विशेषत: कथांचा अनपेक्षित शेवट हे त्यांचे वैशिष्ट्य जी. ए. कुलकर्णी यांच्या लेखनाची आठवण करून देणारे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या कांबळे यांच्या कथा समाजाला मार्गदर्शक आहेत!’ यावेळी राजेंद्र सबनीस, मुग्धा पुजारी, सुधीर वैद्य आणि मंगेश उंबराणी यांनी शहाजी कांबळे यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला; तर लेखक शहाजी कांबळे यांनी आपल्या मनोगतातून, ‘सेवानिवृत्तीनंतर माझ्या लेखनाचा आवाका वाढला अन् त्याला वेग आला. अर्थातच यासाठी पत्नी, मित्रपरिवार आणि कार्यालयीन सहकारी यांचे प्रोत्साहन मोलाचे ठरले. ‘कथा संजीवनी’ या कथासंग्रहाला प्राप्त झालेल्या विविध पुरस्कारांनी लेखनाला आत्मिक बळ लाभले!’ अशा भावना व्यक्त केल्या. रमेश इनामदार यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘शहाजी कांबळे यांच्या पाचव्या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे याचा खूप आनंद वाटतो. त्यांच्या लेखनावर माॅरिशस विद्यापीठातील विद्यार्थिनी विद्यावाचस्पती (पीएच. डी.) या पदवीसाठी प्रबंधलेखन करीत आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. कांबळे उत्तम कथाकार आहेत तसेच उत्तम गायकही आहेत. सूर त्यांच्या रोमारोमांत भिनला असून त्यातूनच शब्द निर्माण होतात अन् वाचकांच्या मनाला स्पर्श करतात!’ असे गौरवोद्गार काढले.

दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन आणि त्रिवार ओंकाराने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. शामकांत खटावकर यांनी शंखनाद करून प्रकाशन सोहळ्यात मांगल्याची अनुभूती दिली. शहाजी कांबळे यांच्या शालेय मित्रपरिवाराने कार्यक्रमाचे संयोजन केले. नंदकुमार मुरडे यांनी सूत्रसंचालन केले. नीलिमा कांबळे यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *