पुणे दि.१ एप्रिल (सिटीनामा वृत्तसेवा)
सेटट्राइब ह्या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी कार्य करणाऱ्या किनवट स्थित महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त आयटी कंपनीने पुण्यामध्ये ‘स्टेप बाय सेटट्राईब’ या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ केला आहे. हा शुभारंभ सोहळा महादेवअण्णा कोंढरे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा, ज्ञानसागर इन्स्टिटूट (डी आय एम आर) पुणे चे संचालक श्री साजिद अल्वी, एसीपी (से.नि.) मंदार नाईक ह्यांच्या हस्ते झील शिक्षण संस्थेचे जयेश काटकर, सीड इन्फोटेक चे संस्थापक नरेंद्र बराटे, लोटस बिझनेस स्कूल चे कार्यकारी संचालक चारुदत्त बोधनकर, कॅट इंडिया चे आशिष वाडकर ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न झाला.
ग्रामीण भागातील गुणवत्ता जेव्हा जिद्द आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड घेते, तेव्हा ती शहरांच्या सीमा ओलांडून यशाचे नवे शिखर गाठते. साधारणपणे मोठे ब्रँड्स शहराकडून गावाकडे येतात, परंतु किनवटमध्ये जन्मलेला आणि तिथेच विस्तारलेला ‘सेटट्राईब’ हा ब्रँड आता पुण्यासारख्या आयटी हबमध्ये १०० सीट्सच्या आधुनिक ऑफिसमधून आपले कार्य सुरू करत आहे. विशेष म्हणजे, स्टेप बाय सेटट्राइब ह्या संपूर्ण उपक्रमाचे नेतृत्व किनवटमधूनच प्रशिक्षण घेतलेले आणि तिथेच घडलेले विद्यार्थी करणार आहेत, ही दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किनवट तालुक्यासाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे.
सदर शुभारंभ सोहळ्याला आयटी तज्ञ राजेश वर्तक, आयएसओ तज्ञ जितेंद्र कारखानीस, एसएपी तज्ज्ञ पंकज वाघमारे, श्सेंट्रल स्कूल चे संचालक अफझल पीरजादे, प्रोफेसर इफ्तिकार खान, फहाद इलियाझ, माजी सरपंच शिवाजी धुमाळ, सचिन निंबाळकर, नचिकेत जोशी, जेष्ठ पत्रकार प्रदीप वाकोडीकर ह्यांच्यासह आयटी क्षेत्रातील तसेच आयटी प्रशिक्षण क्षेत्रातील अनेक नामवंतांची उपस्थिती होती.
पुण्यातील अनेक नामवंत महाविद्यालये, आयटी प्रशिक्षण संस्था आणि आयटी क्षेत्रातील मान्यवरांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला असून याअंतर्गत विद्यार्थ्यांना एआय एनेबल्ड सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अद्ययावत कोडिंग शिक्षण, लाईव्ह प्रोजेक्ट्स, शासनाच्या विविध सॉफ्टवेअर निर्मितीच्या प्रकल्पांवर काम करण्याची संधी, इंटर्नशिप प्रोग्राम्स उपलब्ध करून देणार असल्याचे कंपनीचे संचालक सारंग वाकोडीकर व सहसंचालक पांडुरंग धुमाळ ह्यांनी सांगितले.
