चिंचवड / पुणे दि.१५ मे (सिटीनामा वृत्तसेवा)
नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत भारतातर्फे प्रणित गणेश आढाव यांनी ट्रॅडिशनल योगा आणि आर्टिस्टिक योगा या दोन्ही प्रकारांमध्ये शानदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकाविले.
हाँगकाँग येथे दिनांक ९ मे आणि १० मे रोजी संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत
११ राष्ट्रांचा सहभाग होता. या प्रतिष्ठित स्पर्धेत प्रणित ने भारताचे प्रतिनिधित्व करून सुवर्ण पदक पटकावून देशाचा लौकिक वाढवला.
योगशिक्षिका वर्षा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रणित यांनी अथक मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश संपादन केल्याचे त्याने सांगितले. त्याच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या योगपरंपरेचा गौरव वाढला आहे.
प्रणित याच्या या अभूतपूर्व यशामुळे शांतीबन सोसायटीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रणित भारतात परतल्यानंतर सोसायटीच्या प्रवेशद्वारावर सर्व रहिवाशांनी आणि परिवाराने उत्साहात त्यांचे जल्लोषात स्वागत केले. टाळ्यांचा कडकडाट, पुष्पवृष्टी आणि अभिनंदनाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
या यशाबद्दल विविध मान्यवरांनी प्रणित आढाव यांचा सत्कार व कौतुक केले. मावळचे खासदार श्रीरंगआप्पा बारणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे,महानगरपालिका विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेवक विश्वजित बारणे, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे यांच्यासह पिंपरी चिंचवड महानगरपालिका माजी महापौर व विद्यमान नगरसेविका अपर्णा डोके, नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, पुणे महानगरपालिका नगरसेवक सुनील पांडे, शुभम वाल्हेकर, किरण दळवी, पिंपरी चिंचवड आय टी आय चे प्राचार्य ज्योत सोनवणे, हुंडई कंपनी जनरल मॅनेजर महेंद्र पाटील, संस्कार भारती पश्चिम प्रांत पिंपरी चिंचवड समितीचे उपाध्यक्ष प्रफुल्ल भिष्णुरकर, योगशिक्षिका सौ. वर्षा पाटील, क्रीडा शिक्षक प्रमोद करपे, सामाजिक कार्यकर्ते संदीप दळवी तसेच शांतीबन सोसायटीचे सेक्रेटरी सागर कौशिक यांनी प्रणितचे कौतुक केले.
सर्व मान्यवरांनी प्रणितवर कौतुकाचा वर्षाव करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
