सावरकर जयंती: सावरकरांनी राष्ट्रवादाची गर्जना केली – सौरभ देवीकर

Share this News

निगडी दि.२८ मे (सिटीनामा वृत्तसेवा)
“पारतंत्र्यातील राष्ट्र हे कायम दुबळे असते, जोवर ब्रिटिश या देशावर राज्य करतील तोवर त्याविरुद्ध तीव्र प्रतिकार करणे हे प्रत्येक देशभक्ताचे कर्तव्य आहे, हा विचार सावरकरांनी मांडला. स्वतःच्या सद्गुणांचा, विद्येचा उपयोग देशसेवेसाठी होणार नसेल तर अशा विद्येचा भार व्यर्थ आहे या भावनेतून सावरकर अखेरपर्यंत देशसेवेत मग्न होते. लोकप्रियतेचा मोह बाजूला सारून देशापुढे असणाऱ्या संकटांविषयी सातत्याने जनजागृती करण्याचे काम त्यांनी केले. स्वातंत्र्यानंतर सुद्धा देशापुढील समस्यांविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. सावरकरांनी अखेरपर्यंत राष्ट्रवाद जोपासला. स्वतंत्र भारतात राष्ट्रवादी विचारांची गर्जना सर्वप्रथम सावरकरांनी केली.” असे प्रतिपदन इतिहास अभ्यासक सौरभ देवीकर यांनी केले आहे.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड शहर पातळीवर अभिवादन करण्यात आले. विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या अभिनव भारत विचार मंचाच्या वतीने
स्वा. सावरकर उद्यान (गणेश तलाव ) येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या शिल्पाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिल्हा संघचालक विनोद बन्सल हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी नगरसेविका सुप्रिया चांदगुडे, नगरसेवक अमित गावडे व कुशाग्र कदम, प्रकाश क्षिरसागर, अरविंद वाडकर, शाहिर प्रकाश ढवळे, विश्वनाथ नायर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मंचाच्या वतीने भास्कर रिकामे व विश्वास करंदीकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून कृतज्ञता व्यक्त केली.

अभिनव भारत विचार मंचाचे निमंत्रक राजेंद्र घावटे यांनी प्रास्ताविक केले. विनोद बन्सल यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. हेमंत देवकुळे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला.

देवीकर पुढे म्हणाले की, “अंदमानातून रत्नागिरीला आल्यानंतर सावरकरांनी संपूर्ण जीवन हिंदूंच्या संघटनासाठी व सामाजिक ऐक्यासाठी समर्पित केले.

स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र भारत हा लोकशाही आणि प्रजासत्ताक पद्धतीने चालणारा देश असावा, भारताची वाटचाल ही विज्ञाननिष्ठ आणि बुद्धिनिष्ठ घटनेनुसार झाली पाहिजे असे आग्रही प्रतिपादन सावरकरांनी केले.

प्रतिभासंपन्न साहित्यिक,अमोघ वक्ते ,ज्वलंत राष्ट्रभक्त, समाजसुधारक, संघटक असे सावरकरांचे बहुविध पैलू आजच्या तरुणांसमोर येणे गरजेचे आहे. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषावणारे ते एकमेव क्रांतिकारक होते. छत्रपती छत्रपती शिवरायांना यांना त्यांनी आदर्श मानले होते .” असे ते म्हणाले

सावरकर जयंती शहर पातळीवर महापालिकेच्या वतीने शहरात दोन ठिकाणी तीन दिवसांची व्याख्यानमाला भरवून साजरी करावी अशी मागणी उपस्थितांनी केली. उपमहापौर व उपस्थित नगरसेवकांनी या मागणीला पाठिंबा देत नियोजनाचे आश्वासन दिले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजेंद्र बाबर यांनी विशेष सहकार्य केले.
संयोजनात योगेश निसळ, दिपक नलावडे, अतुल इनामदार आदिंनी सहभाग घेतला.

मुख्य संयोजक भास्कर रिकामे यांनी सूत्रसंचालन केले

सावरकर विचारांचे जेष्ठ अभ्यासक विश्वास करंदीकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *