‘समर्थ’सारख्या संस्कारक्षम चित्रपटाला स्क्रीन नाहीत? यापेक्षा मोठे दुर्दैव महाराष्ट्राचे नाही!

Share this News

पुणे दि.२७ ऑगस्ट (सिटीनामा वृत्तसेवा)

आजच्या तरुण पिढीसमोर चांगले विचार, संस्कार, आदर्श आणि सकारात्मक जीवनमूल्ये मांडणाऱ्या कलाकृतींची नितांत गरज आहे. अशा परिस्थितीत ‘समर्थ’सारखा चित्रपट तरुणाईला प्रेरणा देणारा, सुसंस्कृत विचारांचे दर्शन घडवणारा आणि समाजाला योग्य दिशा देणारा चित्रपट म्हणून निश्चितच महत्त्वाचा ठरतो.

एकीकडे प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असताना आणि चित्रपट पूर्ण क्षमतेने चित्रपटगृहांमध्ये चालण्याची क्षमता दाखवत असताना, दुसरीकडे या चित्रपटाला पुरेशा स्क्रीन उपलब्ध न होणे ही अत्यंत खेदजनक बाब असल्याचे डॉ.सचिन बोधनी म्हणाले.

ज्या चित्रपटातून आपल्या संस्कृतीचा, संस्कारांचा, आदर्शांचा आणि सकारात्मक विचारांचा संदेश तरुणांपर्यंत पोहोचतो, अशा चित्रपटाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठीच स्क्रीन मिळत नसतील, तर यापेक्षा मोठे दुर्दैव आपल्या तरुणाईचे आणि महाराष्ट्राचे दुसरे काय असू शकते?

या संदर्भात आम्ही महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ना. आशीष शेलार यांच्याशी पत्रव्यवहार करून हा विषय त्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. आमची त्यांना नम्र विनंती आहे की, केवळ व्यावसायिक गणित न पाहता समाज आणि तरुण पिढीवर सकारात्मक परिणाम करणाऱ्या चित्रपटांकडेही संवेदनशीलतेने पाहणे आवश्यक आहे.

आजच्या तरुणांना केवळ मनोरंजन नव्हे, तर प्रेरणा, आदर्श, संस्कार आणि राष्ट्राभिमानाची जाणीव करून देणाऱ्या कलाकृतींचीही गरज आहे. त्यामुळे अशा चित्रपटांना योग्य व्यासपीठ आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणे ही समाजाची गरज आहे.

म्हणूनच ‘समर्थ’ चित्रपटाला महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये आवश्यक त्या प्रमाणात तातडीने स्क्रीन उपलब्ध करून देण्यासाठी सांस्कृतिक विभागाने आणि संबंधित यंत्रणांनी सकारात्मक हस्तक्षेप करावा, अशी आमची आग्रही पण नम्र मागणी आहे.

हा प्रश्न केवळ एका चित्रपटाला स्क्रीन मिळण्यापुरता मर्यादित नाही. आपण आपल्या तरुण पिढीसमोर कोणते विचार आणि कोणते आदर्श ठेवणार आहोत, हा त्यामागचा व्यापक सांस्कृतिक प्रश्न आहे.

महाराष्ट्र ही संत, समाजसुधारक, क्रांतिकारक आणि राष्ट्रपुरुषांची भूमी आहे. त्यामुळे समाजाला योग्य दिशा देणाऱ्या आणि संस्कारक्षम विचारांना प्रोत्साहन देणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे. त्याच परंपरेला साजेसे पाऊल उचलून ‘समर्थ’ चित्रपटाला त्वरित स्क्रीन मिळवून द्याव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. सचिन बोधनी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *