चिंचवड: ‘स्व. गजानन मेहेंदळे इतिहास अभ्यास मंडळ’ वर्षपूर्ती सोहळा उत्साहात

Share this News


​चिंचवड / पुणे दि.२२ जून (सिटीनामा वृत्तसेवा)

शिवशंभू विचार मंच द्वारा संचालित ‘स्व. गजानन मेहेंदळे इतिहास अभ्यास मंडळ, चिंचवड’ चा वर्षपूर्ती समारंभ निगडी येथील ‘स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था’ येथे अत्यंत उत्साहात आणि रम्य वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाला इतिहासप्रेमी व अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शनिवार, २० जून २०२६ रोजी झालेल्या या सोहळ्यात इतिहासप्रेमी आणि नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली होती.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या ‘रंगविभोर’ प्रस्तुत ‘मिर्झा’ या विशेष ऐतिहासिक नाट्यप्रयोगाने उपस्थित सर्व रसिकांची मने जिंकून घेतली. कलाकारांच्या कसदार अभिनयाने इतिहास जिवंत केला आणि प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त दाद मिळाली.

नाट्यप्रयोगानंतर झालेल्या मुख्य सत्रात प्रमुख पाहुणे आणि इतिहास प्रेमी मंडळाचे संस्थापक मोहन शेटे सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या ओघवत्या आणि प्रभावी वक्तृत्वातून त्यांनी ‘इतिहासाचा अभ्यास आजच्या काळात किती आवश्यक आहे’, याची जाणीव सर्व श्रोत्यांना करून दिली. त्यांच्या व्याख्यानाने उपस्थितांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीची नवी बीजे रुजवली.
त्यानंतर, ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक प्रा. प्र. के. घाणेकर सर यांनी ‘शिवछत्रपतींच्या दुर्गांचे विज्ञान’ या विषयावर प्रकाश टाकला. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या किल्ल्यांमागे कोणते शास्त्र, भूगोल आणि विज्ञान दडले होते, हे त्यांनी अत्यंत रंजक आणि सोप्या पद्धतीने मांडले. त्यांच्या या अभ्यासपूर्ण व्याख्यानाने दुर्गप्रेमींना एक नवी दृष्टी दिली. या प्रसंगी संयुक्त महाराष्ट्र पत्रकार संघाचे कायदेशीर सल्लागार ऍड. गणेश गायकवाड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

याच सोहळ्यात शिवराज्यभिषेक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा’ देखील मान्यवरांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. विजेत्या स्पर्धकांना यावेळी सन्मानित करण्यात आले.खुल्या गटात विश्वास दसगुडे तर लहान गटामध्ये अस्मि पजई यांनी वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला.

अभ्यास मंडळाचे सदस्य शुभम मोटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सिद्धी पवार व हर्षदा धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले तर गायत्री खरात यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *