आर्टी: युपीएससी-एमपीएससी मार्गदर्शन, परदेशी शिक्षणाच्या संधी व योजनांची माहिती

Share this News

नाशिक दि.२४ मार्च (सिटीनामा वृत्तसेवा)
त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथे अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), मुंबई व महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने २१ व २२ मार्च २०२६ रोजी पंचायत निरंजन आखाडा येथे आयोजित दोन दिवसीय निवासी कार्यशाळा उत्साहात पार पडली. राज्यभरातील विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धा परीक्षा, करिअर, परदेशी शिक्षण व विविध शासकीय योजनांबाबत सखोल मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

पहिल्या दिवशी कार्यक्रमाची सुरुवात चहापान व नावनोंदणीने झाली. उद्घाटन व स्वागत सत्र पार पडले. उद्घाटन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक मा.सुनिल वारे (IRAS) यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रीमती अस्मिता मोरे (उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली) यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी राष्ट्रगीत व संविधान प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले. दीपप्रज्वलन, पुष्पहार अर्पण व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी बोलताना आर्टीचे महासंचालक मा.सुनिल वारे यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत भावनिक आवाहन करत सांगितले की,
“परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षणाच्या जोरावर आपण आयुष्य बदलू शकतो. शासनाच्या योजना, आर्टीसारख्या संस्थांचे मार्गदर्शन आणि स्वतःची जिद्द यांचा संगम साधला तर यश निश्चित आहे. ग्रामीण व वंचित घटकातील विद्यार्थ्यांनी संधी ओळखून मोठे स्वप्न पाहावे आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत.”

आर्टीच्या निबंधक श्रीमती इंदिरा आस्वार यांनी प्रस्ताविकातून संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती देत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, कौशल्य विकास, करिअर मार्गदर्शन व सामाजिक उन्नतीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेत विद्यार्थ्यांनी या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

यानंतर यूपीएससी व एमपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच लातूर महापालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक शिवाजीराव जवळगेकर, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिवा कांबळे, मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. बळीराम गायकवाड, ज्येष्ठ साहित्यिक अण्णा धगाटे, ॲड. विक्रम गायकवाड, अण्णाभाऊ साठे पुरस्कारप्राप्त श्री. भगवान वैरागर आदी मान्यवरांचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा टेबल टॉप पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ग्रंथसंच, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

‘यशवंतांचे सत्कार व मनोगत’

या सत्रामध्ये आर्टी संस्थेच्या सहकार्याने प्रथमच यूपीएससीमध्ये यश मिळवलेली कु. प्रेरणा कैलास खवळे, श्री. मुकेश भगवानराव घाडेकर (मुख्य निवडणूक अधिकारी, निवडणूक आयोग, दिल्ली) व सौ. गितांजली गोपाळ साळे यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने शॉल, पुष्पगुच्छ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ग्रंथसंच व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती टेबल टॉप पुतळा भेट देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

या सन्मानाला उत्तर देताना कु. प्रेरणा कैलास खवळे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत सांगितले की,
‘स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी सातत्य, योग्य नियोजन आणि स्वतःवरचा विश्वास अत्यंत महत्त्वाचा असतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कमी साधनसामग्रीची भीती न बाळगता मोठी स्वप्ने पाहावीत आणि त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावेत. अपयश आले तरी खचून न जाता त्यातून शिकत पुढे जात राहणे गरजेचे आहे. आर्टीसारख्या संस्थेमुळे योग्य दिशा मिळते, त्याचा नक्कीच फायदा घ्यावा.’

यानंतर स्नेहभोजनानंतर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्र झाले. अनील खडसे (IRS), उपायुक्त, जीएसटी, नागपूर यांनी यूपीएससी/एमपीएससी परीक्षेची तयारी कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले, तर प्रा. राम खैरनार यांनी अभ्यासाची पद्धत व नियोजन यावर मार्गदर्शन केले.

“परदेशी शिक्षणाच्या संधी व शिष्यवृत्ती” या विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात आले. विश्वास सपकाळ (भारताचे पेरू येथील राजदूत), गौरव कांबळे व अपूर्वा मॅडम (कॅनडा), विशाल लोमटे (ऑस्ट्रेलिया), कु. रेवती सिरसाट (यूके) व कु. रोमा आव्हाड (यूएसए) यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.

त्यानंतर करिअर मार्गदर्शन सत्रात प्रा. डॉ. बाळासाहेब वाल्हेकर यांनी विविध करिअर पर्यायांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा समारोप श्रीमती इंदिरा आस्वार यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. त्यानंतर शाहिरी जलसा आयोजित करण्यात आला. इंडियन आयडॉलमधील प्रसिद्ध गायक प्रतीक सोळसे व त्यांच्या संचाने फुले-शाहू-आंबेडकर विचारांवरील गीतांचा कार्यक्रम सादर केला.

दुसऱ्या दिवशी योगगुरू प्राचार्य उत्तम अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली योगासन सत्र पार पडले. त्यानंतर संत निवृत्ती महाराज मंदिर, मांग धर्मशाळा व श्री त्र्यंबकेश्वर मंदिर येथे हेरिटेज वॉक आयोजित करण्यात आला.

यानंतर उद्घाटन व स्वागत सत्र पार पडले. उद्घाटन मा. श्री. सुनिल वारे यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक करताना त्यांनी आर्टीच्या विविध योजना, प्रशिक्षण कार्यक्रम व सामाजिक न्यायासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देत विद्यार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

यानंतर ज्येष्ठ साहित्यिक प्रा. राजू बाविस्कर यांचा ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मचरित्रासाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. हार्ट बीट ऑर्केस्ट्राच्या वतीने फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा सांस्कृतिक जागर सादर करण्यात आला.

पुढील सत्रात विविध योजनांवर मार्गदर्शन करण्यात आले. मा. श्री. विक्रांत बगाडे यांनी औद्योगिक विकास महामंडळाच्या योजना, श्री. मल्ली श्रीधर प्रसाद राव यांनी खादी ग्रामोद्योगाचे कोर्सेस व योजना, तर श्रीमती राजाबाई गंगाराम बोडके यांनी कृषी विषयक योजना व कोर्सेस यांची माहिती दिली.

या कार्यक्रमात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे वंशज सचिन साठे, सुनबाई सावित्रीबाई साठे व डॉ. दिलीप अर्जुने यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्नेहभोजनानंतर आर्टी संस्थेच्या योजनांची माहिती व भविष्यातील वाटचालीवर चर्चा झाली. प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती इंदिरा आस्वार यांनी केले.

या दोन दिवसीय कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. धनंजय भिसे यांनी अत्यंत प्रभावी, नेटक्या व ओघवत्या शैलीत केले. प्रत्येक सत्राची अचूक मांडणी, मान्यवरांची प्रभावी ओळख आणि सत्रांमधील सुसंगत दुवे साधण्याची त्यांची शैली विशेष ठरली. प्रसंगानुरूप विनोदबुद्धी, स्पष्ट उच्चार आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे संपूर्ण कार्यक्रम अधिक रंजक व आकर्षक झाला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मांग लोकांची धर्मशाळा व सामाजिक संस्था, त्र्यंबकेश्वर (नाशिक) यांच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. अध्यक्ष पंडीतराव जाधव, उपाध्यक्ष बाळासाहेब शिरसाठ, सचिव प्रा. अनिलजी शिरसाठ, कोषाध्यक्ष उल्हास खैरनार, सह-कोषाध्यक्ष प्रा. किशोर काळे, सहसचिव कैलास दोडके, विश्वस्त संतोष अहिरे, नाना वाघमारे, इंजि. प्रल्हाद पानपाटील, स्वामी (ज्ञानेश्वर) अहिरे, दिलीप खरात, प्रमुख सल्लागार अहिरे यू. के. (सर), एन्. डी. कांबळे तसेच सेवेकरी केशव बाबा जाधव, अनिल निरभवणे, यशवंत तथा बाळासाहेब, सिरसाठ, यश सिरसाठ, प्रा. नितिन मरसाळे, डॉ. प्रदीप आवळे आदींसह अनेकांचे सहकार्य लाभले.

या दोन दिवसीय कार्यशाळेत एकूण ५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी करून सहभाग घेतला. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, करिअर, परदेशी शिक्षण व शासकीय योजनांबाबत सर्वांगीण मार्गदर्शन मिळाले असून त्यांच्या भविष्यासाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना सहभागी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *