– सह्याद्री इंटरनॅशनल शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
आळंदी दि.१८ (सिटीनामा वृत्तसेवा)
नव्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थांच्या व्यक्तिमत्व विकासाला मोठी चालना मिळणार असून कौशल्यधारित मूल्याधिष्ठित शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती होणार असल्याने नवी शैक्षणिक प्रणाली महत्वपूर्ण असल्याचे मत विद्याभारती पुणे जिल्हा सहमंत्री व ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूलचे साहेबराव बोडके यांनी व्यक्त केले ते आळंदी देवाची येथे अभिनव एज्युकेशन सोसायटी संचालित सह्याद्री इंटरनॅशनल शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात बोलत होते.
यावेळी अभिनव एज्युकेशन सोसायटी आळंदी देवाची अध्यक्ष गणेश गरुड, संचालक बाबाजी काळे , उपाध्यक्ष आप्पा लोखंडे, संचालक सचिन मेथे, मुख्याध्यापिका सौ.प्रियांका लांडे, भापकर प्रामुख्याने उपस्थित होते.
भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात संपन्न झालेल्या भावगंध वार्षिक स्नेहसंमेलनात
प्रमुख अतिथी साहेबराव शांताराम पाटील बोडके यांनी पुढे बोलतांना वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून मुलांच्या कलागुणांना वाव मिळत असल्याचे सांगून उत्तम सादरीकरणासाठी सह्याद्री शाळेचे व विद्यार्थी, पालक, शिक्षकांचे कौतुक केले.
उद्घाटनानंतर दिवसभर विद्यार्थांच्या स्पर्धा, सादरीकरण सुरू होते. यावेळी शाळेचे विद्यार्थी, पालक, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वितेसाठी शाळेचे व्यवस्थापन मंडळ, शिक्षक, कर्मचारी वृंद, प्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले.

