कोथरूड / पुणे दि.८ सप्टेंबर (सिटीनामा वृत्तसेवा)
श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्य परमेश्वर योगेश्वर स्तुती कार्यक्रम कोथरूड येथील स्वामीकृपा सभागृहात उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला मान्यवरांसह, विविध मंडळांच्या गीताप्रेमी महिलांचा मोठा सहभाग होता. यावेळी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव नामाच्या गजरात सभागृहातील वातावरण प्रफुल्लित झाले होते.
दि.४ सप्टेंबर रोजी योगेश्वर स्तुती कार्यक्रमात श्रीमद् भगवत गीता १८ अध्याय व विष्णू सहस्त्रनाम पठण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात पंच परिवर्तन व्याख्यानात संभाजी भाग संपर्क प्रमुख सचिन अग्निहोत्री यांनी सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधनाचे महत्व, स्व बोध, पर्यावरण विषयक जागरण व महत्व, नागरी कर्तव्ये या महत्वपूर्ण माहिती देऊन सर्वांचे उद्बोधन केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विजयाताई देशपांडे यांनी केले होते. यावेळी झालेल्या योगेश्वर स्तुती गीता पठण या कार्यक्रमाचे हे तब्बल ९५ वे पुष्प होते. या उपक्रमाची सुरुवात श्री क्षेत्र आळंदी येथून करण्यात आली होती असे विश्व हिंदू परिषदेच्या विजयाताई देशपांडे यांनी बोलतांना सांगितले. अशा उपक्रमांमुळे आध्यात्मिक, मानसिक, बौद्धिक अनेक फायदे होतात तणावमुक्ती, एकाग्रता वाढते, सकारात्मक ऊर्जा वाढीस लागून आत्मज्ञान मिळते भक्ती वाढीस लागते त्याचबरोबर कर्मयोग देखील कळतो.
कार्यक्रमाची सांगता महाआरती व महाप्रसादाने झाली. कार्यक्रमात ओंकार स्तोत्र पठण मंडळ, त्रिदल मंडळ, भगवद्गीता पठण मंडळ, गजानन पारायण ग्रुप, रामराया मंडळ यासह अनेकविध मंडळांचे गीता प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
