आषाढी एकादशीचा ब्लूमिंग इंटरनॅशनल शाळेत उत्साह

Share this News

गहुंजे/ पिंपरी चिंचवड (पुणे) दि.२४ जुलै (सिटीनामा वृत्तसेवा)

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त शुक्रवार दि.२४ जुलै रोजी सकाळी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.व्यासपीठावर चिंचवड येथील योगाचार्य व संस्कृती संवर्धन महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ.अजित प्रभाकर जगताप, संस्थेचे सूर्यकांत बोडके, उद्योजक व संस्थेचे खजिनदार साहेबराव बोडके, व्यवस्थापिका सौ.पौर्णिमा बोडके, मुख्याध्यापिका विजीला राजकुमार प्रामुख्याने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी विठ्ठलाच्या नामगजरात अभंग, भजन आणि भारुडे सादर करून संपूर्ण वातावरण भक्तिमय केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते भगवान विठ्ठल–रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.

काही विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त केले. पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी दिंडी काढून “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी संत व वारकरी वेशभूषा करुन उपस्थितांचे लक्ष वेधले.

यावेळी बोलतांना डॉ.जगताप म्हणाले, शिक्षणाबरोबरच चांगले संस्कारही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगून संतांचे विचार आचरणात आणा, पालक-शिक्षकांचा आदर करा, पर्यावरणाचे रक्षण करा आणि नेहमी सत्य व प्रामाणिकतेचा मार्ग स्वीकारा, असे मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी भारतीय संस्कृती, सण उत्सवांचे महत्व अधोरेखित करून या सर्वांचा आदर करत मोठ्या उत्साहात साजरे करण्याचे आवाहन केले.

ब्लूमिंग इंटरनॅशनल शाळा या परिसरातील नामांकित शैक्षणिक संस्था असून शैक्षणिक गुणवत्तेसह विविध उपक्रम मोठ्या उत्साहात होत असल्याचे व्यवस्थापिका सौ.पौर्णिमा बोडके यांनी बोलतांना सांगितले . सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा कार्यक्रम अत्यंत आनंददायी आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळा व्यवस्थापन समिती, सर्व शिक्षक, कर्मचारी, पालक यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *