सामाजिक भान: पूरग्रस्त शाळेच्या मदतीला धावले बाळासाहेब दामले

Share this News

चिंचवड / पुणे दि.२१ जुलै (सिटीनामा वृत्तसेवा)

“देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे । घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे”
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ मराठी कवी विंदा करंदीकर यांच्या या अत्यंत प्रेरक आणि सुंदर काव्यपंक्ती आपल्या आयुष्यात जगणारे अनेक सामाजिक कार्यकर्ते आपल्याला बघायला मिळतात. पुण्यातील चिंचवड भागात पाच ते सात जुलै २०२६ दरम्यान सलग पडलेल्या पावसामुळे चिंचवडमधील सुपरिचित अशा ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् ‘ या शाळेची खूप हानी झाली होती. संपूर्ण शाळेच्या परिसरात पाणी घुसल्याने प्रचंड गाळ माती आणि अस्वच्छता निर्माण झाली होती. शाळेची परिस्थिती पूर्ववत करून पुन्हा एकदा नव्याने उभे राहण्यासाठी सामाजिक जाणिवांचे अनेक हात पुढे आले. यातीलच एक नाव म्हणजे अविनाश नीलकंठ तथा बाळासाहेब दामले. मदतीची हाक साताऱ्यातील ज्येष्ठ स्वयंसेवक, जनकल्याण समितीचे माजी प्रांतिक कार्यकर्ते असलेले अविनाश नीलकंठ तथा बाळासाहेब दामले यांच्या कानी जाताच नेतृत्व, कर्तृत्व या बरोबरच दुर्मिळ असे दातृत्व देखील ज्यांच्याकडे आहे त्यांनी या शाळेच्या पुनर्विकासासाठी त्वरित रुपये एक लाखाचा धनादेश देऊन आपले सामाजिक दायित्व निभावले. मंगळवार दि.२१ जुलै २०२६ रोजी त्यांचे धाकटे चिरंजीव भरत दामले यांनी तो धनादेश शाळेकडे सुपूर्त केला.
या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी चिंचवड जिल्हा संघचालक विनोदजी बन्सल आणि जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे प्रामुख्याने उपस्थित होते. धनादेश स्वीकारल्या नंतर गिरीशकाका प्रभुणे यांनी दामले सरांचे आभार मानले तर दामले कुटुंबियांच्या वतीने योग्य ठिकाणी मदत दिल्याचा आनंद व समाधान भरत दामले यांनी व्यक्त केले.सुदैवाने अनेकांच्या विविध प्रकारच्या मदतीमुळे आता शाळा पूर्ववत होत असल्याचे चित्र आहे.

काय आहे समरसता गुरुकुलम ?                          

जेष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री श्री गिरीशजी प्रभुणे यांचा सामाजिक कार्य करतांना फासे-पारधी, कोल्हाटी, डोंबारी, लमाण, नंदीवाले, मरीआईवाले, गोंधळी, वासुदेव इ. समाजाच्या लोकांशी संपर्क आला. परंपरागत अंगभूत कला अवगत असलेले हे लोक शिक्षणापासून मात्र वंचित आहेत असे लक्षात आल्यावर त्यांच्या या कलागुणांसोबतच शिक्षण देखील द्यायची गरज लक्षात आली. त्यांच्यासाठी विविध प्रकारचे शैक्षणिक प्रकल्प राबवले गेले. शिक्षण देऊनही काही मुलं बेरोजगार आहेत. शिक्षणामुळे त्यांच्यातले नैसर्गिक ज्ञान जसे की, औषधी वनस्पतीची नाव व उपयोग इ. ज्ञान मात्र ते विसरलेत. मुलांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या अंगात असलेले उपजत गुणदेखील निपजले पाहिजेत म्हणून, पारंपारिक गुरुकुल पद्धतीचा शोध घेण्यासाठी गुरुकुल पद्धतीनेच मुलांना शिक्षण द्यायचे ध्येय ठेऊन पुण्याजवळ चिंचवड येथे पुनरुत्थान – समरसता – गुरुकुलम संस्थेची स्थापना व सुरुवात झाली. जी मुलं भटकत राहतात त्यांच्यासाठी गुरुकुलम सुरु केलं गेलं. १ ली ते १२ वी इयत्तेत इथे मुलं शिकतात. प्रामुख्याने वडार-पारधी-कष्टकरी वर्गातील ही मुले असून ५ वी ते ९ वी च्या मुलांना पारंपारिक शिक्षणाबरोबरच विविध कौशल्य प्रशिक्षण देखील दिलं जातं. जसे की, शेती-भाजीपाला लागवड, कंपोस्ट खत, रोपवाटिका, बांधकाम, सायकल व मोटरसायकल दुरुस्ती, प्लंबिंग, रंगकाम, कुंभारकाम इ. बरोबरच गायन, वादन, चित्रकला, लेखन, वाचन, संगणक इ. एकूण २० विभागात मार्गदर्शन केले जाते. वनौषधी, पक्षी निरीक्षण, खगोल निरीक्षण यांचाही अभ्यास घेतला जातो. याशिवाय नैपुण्य गटात विविध खेळांचे मार्गदर्शन केले जाते. आणि हे सर्व अनौपचारिक शिक्षणाच्या पद्धतीद्वारे शिकवले जाते. मूळच्या कला-कौशल्य गुणांचा विकास आणि दुर्गुणांचा ऱ्हास, आधुनिक आणि पारंपरिक ज्ञानाची सांगड घालून येथे शिक्षण दिले जाते. मुले इथेच रहात असल्यामुळे हे शक्य होते. दुपारी २.३० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मुलं ही वेगवेगळी कौशल्य शिकतात. एकूणच मुलांच्या मनाचा कल लक्षात घेऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करायचा आणि आधुनिक काळाला सुसंगत असे त्यांना इथे घडवले जाते या गुरुकुलमला भेट दिल्यास नक्कीच नवी दिशा व प्रेरणा मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *