भव्य हिंदू संमेलन: तब्बल १ हजार महिलांच्या हस्ते छत्रपती शिवरायांची महाआरती

Share this News

कासारवाडी भागात हिंदू एकतेचे भव्य दर्शन

कासारवाडी / पिंपरी (पुणे) दि.९ मार्च (सिटीनामा वृत्तसेवा)

सर्वत्र भगवे ध्वज, भगव्या पताका, रांगोळ्यांनी सजलेल्या कासारवाडीतील केशवनगर आणि जवळकर वसाहत परिसरातील हजारो महिलांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांची महाआरती करून जातीपाती विरहित सकल हिंदू एकतेचे दर्शन घडविले.

रविवार दि.८ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता कासारवाडी भागातील परिसरातील तब्बल एक हजारावर महिलांनी छत्रपती शिवरायांची सामूहिक महाआरती करून अनोखा महिला दिन साजरा केला. सकल हिंदू समाज कासारवाडी यांच्यावतीने आयोजित भव्य हिंदू संमेलन रेल्वे गेटजवळील गारजाई देवी चौकाजवळ उत्सहात संपन्न झाले. यामध्ये कासारवाडीतील तमाम हिंदू बंधू भगिनी, विविध संस्था, संघटना, मित्र मंडळे, प्रतिष्ठाने, गणपती मंडळ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्य, यशस्वी उद्योजिका सौ.बागेश्रीताई मंठाळकर यांनी बोलतांना भारतीय स्त्रियांचे योगदान अधोरेखित करून महिलांना भारतीय संस्कृतीने कायम सन्मानाचे स्थान दिल्याचे सांगितले. आजही मुलींना, महिलांना अनेक आव्हानाचा सामना करावा लागत असल्याचे सांगून लव जिहाद चे मोठे संकट असल्याचे सांगितले. प्रत्येक हिंदू मुलीने, महिलेने आपली संस्कृती, धर्म समजून घेऊन लव जिहादला बळी न पडता स्वतःसोबत परिवारात, परिसरात जागृती करण्याचे आवाहन केले. प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी आपल्या धर्माबाबत अभिमान बाळगून आपली महनीय भारतीय संस्कृती, परंपरा समजावून घेतल्या पाहिजे, कुटुंब प्रबोधनसोबतच समरस समाज गरजेचा असून जातीपातीच्या भिंती तोडून समस्त हिंदूंनी एकत्रित संघटित होण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजिका सौ.मीनल शुक्ल तर सामाजिक कार्यकर्ते, लेखक नरेंद्र पेंडसे, धनंजय चंद्राद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रमुख जयवंत जाधव होते. सूत्रसंचालन ज्ञानराज तटीकुंडलवार यांनी केले.कार्यक्रमानंतर उपस्थितांना भारतीय पद्धतीने पंगत वाढून प्रसाद वितरीत करण्यात आला.
कार्यक्रमाला परिसरातील हजारो महिला, पुरुष सहभागी झाले होते. या संमेलनाच्या निमित्याने परिसरातील सर्व समाजातील हिंदू बांधव भगिनी एकत्रित आले होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी सकल हिंदू समाज संयोजन समितीने परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *