देहू/ पुणे दि.३ मार्च (सिटीनामा वृत्तसेवा)
क्षेत्र देहू येथे गेल्या अनेक वर्षांपासून तिथीनुसार भव्य दिव्य शिवजयंती सोहळा साजरा केला जातो.
यंदाही दि.२ मार्च पासून शिवजयंती उत्सवाची सुरुवात झाली असून बुधवार दि.४ मार्च २०२६ रोजी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान व शिवजयंती उत्सव समिती श्रीक्षेत्र देहू यांच्या संयुक्त विद्यमाने देहूगाव बाजारपेठ देहू आळंदी रोड, श्री क्षेत्र देहू येथे सायंकाळी ६ वाजता मराठी रंगभूमीवरील सुप्रसिद्ध असलेले संगीत देवबाभळी नाटक सादर होणार आहे.
रंगभूमीवर अतिशय लोकप्रिय व हाऊसफुल्ल होणारे हे मराठी संगीत नाटक आहे. हा संगीत नाट्य प्रयोग संत तुकाराम महाराजांची पत्नी ‘आवली’ आणि साक्षात विठ्ठलाची पत्नी ‘रखुमाई’ यांच्यातील संवाद व भक्तीवर आधारित आहे.
या सुप्रसिद्ध नाटकाचे लेखक, दिग्दर्शन प्राजक्त देशमुख, संगीत आनंद ओक यांचे तर निर्मिती श्रीमती कविता मच्छिंद्र कांबळी यांची आहे. प्रसाद कांबळी सादर संगीत देवबाभळी या नाट्यप्रयोगाला मोफत प्रवेश असून रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान व शिवजयंती उत्सव समिती श्रीक्षेत्र देहू यांनी केले आहे.महाराष्ट्रात भव्यदिव्यतेने साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती उत्सवापैकी श्रीक्षेत्र देहू येथील आदर्श शिवजयंती उत्सव आहे परम पवित्र भगवा ध्वजपूजन, विविध नाट्यप्रयोग, पुरस्कार वितरण सोहळा, सामाजिक उद्बोधन, भव्यदिव्य शोभायात्रा मिरवणूक तसेच उत्सवात सहभागी होणारे विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी मान्यवर हे श्री क्षेत्र देहू येथील शिवजयंती उत्सवाची वैशिष्ट्ये आहेत.
