संगीतविश्वावर शोककळा:स्वरसम्राज्ञी आशा भोसले काळाच्या पडद्याआड

Share this News

मुंबई दि.१२ एप्रिल (सिटीनामा वृत्तसेवा)
मागील आठ दशकांपेक्षा अधिक काळ भारतीय संगीतविश्वात अधिराज्य गाजवणाऱ्या केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील संगीतप्रेमींना आपल्या सुमधुर आवाजाने भुरळ पाडणाऱ्या सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण आशा भोसले यांची वयाच्या ९२ व्या वर्षी प्राणज्योत मालवली. या दुःखद घटनेमुळे संगीतप्रेमींवर आघात झाला असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.
पीटीआय सूत्रांनुसार प्रकृती अस्वस्थ्यामुळे आशा भोसले यांना शनिवारी मुंबईतील ब्रिज कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच ठिकाणी रविवार दि.१२ एप्रिल रोजी दुपारी त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांचे पुत्र आनंद यांनी दिली.
सोमवार दि.१३ एप्रिल रोजी त्यांचे पार्थिव सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून सायंकाळी ४ वाजेदरम्यान मुंबईतील शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती आहे.

भारतरत्न स्व.लतादीदी मंगेशकर यांच्या धाकट्या भगिनी असलेल्या सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांनी पन्नासच्या दशकात आपल्या कारकीर्दीस प्रारंभ केला. आपल्या सुरेल आवाजाने त्यांनी मराठी हिंदी भाषेसोबतच तेलगू, तामीळ, गुजराती, बंगाली, पंजाबी अशा वीस पेक्षा अधिक विविध भाषांमधून हजारो अजरामर गाणी गायली. ग्रॅमी पुरस्कार नामांकन मिळवणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय गायिका होत्या. रोमँटिक गाण्यापासून तर भावगीतांपर्यंत अनेक प्रकारातील गाण्यांना त्यांनी चाहत्यांच्या हृदयावर कोरून ठेवले.त्यांच्या नावावर अनेक विक्रम असून त्यांच्या निधनाने भारताने संगीत विश्वातले एक महत्वाचे रत्न गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *