पिंपरी चिंचवड/ पुणे दि.१३ मे (सिटीनामा वृत्तसेवा)
पिंपरी चिंचवड शहरातील
संजीव आणि आरती कमलादिन्नी यांची कन्या स्नेहा कमलादिन्नी हिने नुकत्याच १० मे रोजी चीनच्या हैनान प्रांतात संपन्न झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भाग घेऊन तब्बल ३ पदके जिंकून शहरासह भारताच्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. तिने सर्वसाधारण गटात कांस्य पदक, डेड लिफ्ट १७५ किलो गटात सुवर्ण पदक
व स्क्वॉट लिफ्ट प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली आहे.
स्नेहा ही आकुर्डी येथील पी सी सी ओ इ ची बी.ई.च्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी आहे. तिने चार वर्षांपूर्वी जिमच्या माध्यमातून आपला फिटनेसचा प्रवास सुरू केला आणि हळूहळू पॉवर लिफ्टिंगचे कौशल्य विकसित केले. पॉवर लिफ्टिंग हा तरुण फिटनेसप्रेमींमध्ये लोकप्रिय असलेला एक खेळ आहे. याचे नियमन इंटरनॅशनल पॉवर लिफ्टिंग फेडरेशनद्वारे केले जाते. भारतात याचे नियमन पॉवरलिफ्टिंग इंडियाद्वारे केले जाते.

गेल्या ३ वर्षांपासून तिने राष्ट्रीय स्तरावरील ज्युनियर ५२ किलो वजनी गटात सातत्याने विजय मिळवला आहे आणि यावर्षी राष्ट्रीय चॅम्पियनशिपच्या सर्व गटांमध्ये विजय मिळवून ती ‘सुपरवुमन’ ठरली आहे.
तिने हे यश स्वतःच्या हिमतीवर मिळवले आहे आणि तिचा आहार कोणत्याही बाह्य घटकांचा वापर न करता अस्सल व सर्वांगीण होता.
तिच्या या यशात तिच्या आईची भूमिका महत्वाची आहे. खेळाडूच्या आहाराची काळजी घेणे ही आईची एक मोठी जबाबदारी असते. तिच्या या यशाचे श्रेय आई वडील कुटुंबीय, मार्गदर्शक तसेच मित्र परिवाराला दिले आहे.
तिने आपल्या अभ्यासाशी आणि शिक्षणाशी तडजोड न करता हे यश मिळवले असून
एक यशस्वी खेळाडू बनण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी तिने गेल्या ४ महिन्यांत इंटर्नशिपसुद्धा केली असल्याचे स्नेहाच्या कुटुंबाने सिटीनामा सोबत बोलतांना सांगितले.
स्नेहा प्राणीप्रेमी असून उत्तम यशासह पदवी, सर्वांगीण आहार आणि कठोर फिटनेस दिनचर्या, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग हे तिच्या यशाचे गमक असल्याचे स्नेहा सांगते.
तिच्या या यशाबद्दल अनेकांनी कौतुक केले असून अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
