चिंचवड दि.७ ऑगस्ट (सिटीनामा वृत्तसेवा)
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याला आणि कार्यकर्तृत्वाला लोकमान्यता व विश्वमान्यता मिळण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांनी स्वतःला किंवा आपल्या कार्याला कोणत्याही एका समाजापुरते मर्यादित ठेवले नाही. जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांनी विविध भूमिका समर्थपणे निभावल्या. मात्र, शोषित, वंचित, दलित आणि उपेक्षितांच्या प्रश्नांचे प्रवक्ते म्हणून त्यांची भूमिका सातत्याने कायम राहिली. त्यांनी आपली दृष्टी कोणत्याही एका विशिष्ट समाजापुरती मर्यादित न ठेवता व्यापक मानवी समाजाला कवेत घेतले. त्यामुळे अण्णाभाऊ साठे हे सामाजिक एकात्मतेचे प्रतीक म्हणून आपल्यासमोर येतात, असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्व समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व २०२६’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. सहस्रबुद्धे पुढे म्हणाले, “अण्णाभाऊंच्या प्रतिभेचा संचार सांस्कृतिक क्षेत्रातील सर्वच अंगांमध्ये झाला. काव्य, शाहिरी, पोवाडा, नाट्य, लोकनाट्य, चित्रपटांच्या कथा, कथा, कादंबऱ्या आणि प्रवासवर्णने अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले. यामागे त्यांची साहित्याशी असलेली निष्ठा आणि भारतीय प्रतिभेच्या संस्कृतीशी असलेली प्रामाणिक बांधिलकी होती. म्हणूनच अण्णाभाऊ साठे हे सांस्कृतिक एकात्मतेचेही प्रतीक ठरतात.”
“त्यांची प्रतिभा कोणत्याही सीमा मानणारी नव्हती. ‘विश्वाची माझे घर’ या व्यापक मानवी दृष्टिकोनापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेली वैचारिक प्रगल्भता अण्णाभाऊंच्या ठायी होती. म्हणूनच त्यांना स्टॅलिनग्राडचा पोवाडा लिहावासा वाटला, रशियाला जावेसे वाटले आणि रशियन राज्यक्रांतीचा अभ्यास करावासा वाटला. राष्ट्रीय, सामाजिक आणि सांस्कृतिक एकात्मतेबरोबरच वैश्विक एकात्मतेची आस त्यांच्या मनात होती. त्यामुळे अण्णाभाऊ साठे हे वैश्विक एकात्मतेचेही प्रतीक आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.
अण्णाभाऊंच्या साहित्याविषयी बोलताना डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले, “अण्णाभाऊंचा उल्लेख पहिले दलित बंडखोर साहित्यिक म्हणून केला जातो. त्यांच्या विचारांमध्ये बंडखोरी निश्चितच होती; परंतु त्या बंडखोरीचा केंद्रबिंदू संतुलन आणि समन्वय हा होता. त्यांनी ज्या हालअपेष्टा सोसल्या, ज्या संघर्षातून त्यांना जावे लागले, त्यातून त्यांच्यात विद्रोह निर्माण झाला. मात्र, बंडखोरी म्हणजे अराजकता किंवा आकांडतांडव नव्हे, ही त्यांची भूमिका होती. त्यामुळे त्यांचा विद्रोह हा समन्वयाच्या भूमिकेतून आलेला होता.”
“अण्णाभाऊंना विद्रोही साहित्यिक म्हटले जाते; परंतु त्यांच्या विद्रोहात वैफल्याला स्थान नव्हते. त्यांच्या साहित्यात निराशा नाही, तर आशावाद आहे. ते ‘इन्टर्नल ऑप्टिमिस्ट’—चिरंतन आशावादी होते. संघर्ष करतानाही परिवर्तनाची आणि उज्ज्वल भविष्याची आशा त्यांनी कधी सोडली नाही,” असे डॉ. सहस्रबुद्धे यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, “अण्णाभाऊंच्या भूमिकेला त्यांच्या वैविध्याचे कोंदण होते. मात्र, वैविध्याचा पुरस्कार करताना काही वेळा समाज विभाजनाच्या दिशेने जातो. अण्णाभाऊंनी असे कधीही होऊ दिले नाही. वैविध्याचा शेवट विभाजनात होऊ नये, अशी त्यांची एकात्मतेची भूमिका त्यांच्या साहित्यामध्ये ठळकपणे दिसून येते.”
“अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे संघर्ष-साहित्य आहे; मात्र त्यात संघर्षाबरोबरच समन्वयही आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यास त्यांनी कधीही संकोच केला नाही. त्याचवेळी विकृतीवर प्रहार करताना संपूर्ण संस्कृती नाकारली जाणार नाही आणि समाजाच्या श्रद्धांचा भंग होणार नाही, याचीही त्यांनी काळजी घेतली. त्यामुळे त्यांचे साहित्य हे केवळ विद्रोहाचे नव्हे, तर समन्वय, सामाजिक परिवर्तन आणि एकात्मतेचे साहित्य आहे,” असे डॉ. सहस्रबुद्धे यांनी सांगितले.
या कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), मुंबई यांच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या माहिती पुस्तिकेचे लोकार्पण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आमदार अमित गोरखे, पद्मश्री डॉ. गिरीश प्रभुणे, हेमंत हरहरे, विलास लांडगे, डॉ. धनंजय भिसे, प्रबोधन पर्व समितीचे अध्यक्ष गणेश अवघडे, राजू आवळे, नाना कसबे, संजय ससाणे, अरुण जोगदंड, रोहन भिसे, रोहित भिसे, प्रसाद केसरे, ऍड्.भूषण पाटील, सतीश भवाळ आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. धनंजय भिसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
