पिंपरी दि.१४ एप्रिल (सिटीनामा वृत्तसेवा)
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव बोधीसत्व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका,विविध संस्था, संघटनांतर्फे महामानवास अभिवादन करण्यात आले. महापौर रविभाऊ लांडगे यांचेसह अनेक लोकप्रतिनिधी, विविध आस्थापनाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी अभिवादन केले. यावेळी पिंपरी स्मारक परिसर फुलून गेला होता. ठिकठिकाणी डॉ.बाबासाहेबांना अभिवादन पर विविध कार्यक्रम, शोभायात्रांची रेलचेल सुरू आहे.
पिंपरी चिंचवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे अभिवादन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिंपरी चिंचवड जिल्हा आणि समरसता गतिविधि यांच्या वतीने पिंपरी चौकातील भिमसृष्टी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास्थानी दि.१४ रोजी सकाळी ७.३० वाजता दरम्यान पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

त्यानंतर स्मारक परिसरातील संविधान उद्देशिकेला अभिवादन करून भारतीय संविधानाचे रक्षण करण्याचा निर्धार करण्यात आला.
या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी चिंचवड जिल्हा संघचालक विनोद बन्सल, हेमंत हरहरे,जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे, विलास लांडगे, सांगवी गट संघचालक लक्ष्मण पवार, जेजुरी देवस्थानचे विश्वस्त
अनिल सौंदडे, वेणु साबळे,डॉ. धनंजय भिसे,सोपान कुलकर्णी यांचेसह शहरातील स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते,
समरसता गतिविधीतर्फे पाणपोई, वही पेन संकलन उपक्रम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दरवर्षी रा.स्व. संघाच्या वतीने शहरात विविध कार्यक्रम, व्याख्यान, वही पेन संकलन आदी उपक्रमांच्या आयोजनासोबतच पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळास्थानी अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांकरिता स्व.तात्या बापट स्मृती समिती यांचे वतीने पाणपोईची सोय देखील करण्यात येत असते. कोरोना प्रादुर्भावाचा अपवाद वगळता मागील ३० वर्षांपासून ही अविरत सेवा सुरू असल्याचे समरसता गतिविधी तसेच समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. अभिवादनस्थळी येणाऱ्या नागरिक या पाणपोईचा लाभ घेत आहेत. ग्रामीण भागातील वंचित मुलांसाठी ‘ एक वही एक पेन ‘ अभियानातंर्गत संकलित केलेले वह्या आणि पेन भारतीय बौद्धजन विकास समितीला सुपूर्द करण्यात आले या वेळी स्व.तात्या बापट स्मृती समिती व भारतीय बौद्धजन विकास समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

दलित पँथर ऑफ इंडिया व स्व.दत्तोपंत म्हसकर ट्रस्ट
अन्नदान कार्यक्रम
स्व.दत्तोपंत म्हसकर ट्रस्टच्या पुढाकाराने दलित पँथर ऑफ इंडिया व स्व.दत्तोपंत म्हसकर ट्रस्ट यांचे संयुक्त विद्यमाने मागील १४ वर्षापासून पिंपरी स्मारक परिसरात जयंती निमित्याने अन्नदान कार्यक्रमात भोजन वितरण केले जाते. साधारण पाच हजारपेक्षा अधिक लोक याचा लाभ घेतात. श्री मोरया गोसावी देवस्थान ट्रस्ट, श्रीराम मंदिर ट्रस्ट चिंचवड, अश्विनीताई चिंचवडे यांच्या सहकार्याने
संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पवार, मकरंद कुलकर्णी, जनार्दन वाठारकर यांचेसह अनेक कार्यकर्ते हा उपक्रम राबवीत आहेत.

