चिंचवड दि.३ ऑक्टोबर (सिटीनामा वृत्तसेवा)
भारतीय विचार साधना फाऊंडेशन व स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ यांच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात बुधवार दि.७ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर दरम्यान प्रथमच भव्य राष्ट्रीय पुस्तक मेळ्याचे आयोजन स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ निगडी प्राधिकरण सेक्टर २५ येथे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शहरातील पुस्तकप्रेमींसाठी अनोखी पर्वणी ठरणार असून वाचन संस्कृतीचा जागर होणार आहे.

वाचन संस्कृती अधिक बळकट व्हावी, शहरातील वाचकांना अधिकाधिक समृद्ध साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शहरात या पुस्तक मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळ्यात ५० हून अधिक प्रकाशकांची हजारो पुस्तके उपलब्ध असणार आहेत,
संस्कारक्षम पुस्तके, इतिहास, संस्कृती, सामाजिक ,राष्ट्रीय, विज्ञान ,शेती, पर्यावरण , योग, आरोग्य, संतसाहित्य , अर्थकारण , समरसता , थोर पुरुष चारित्र्ये, कुटुंब प्रबोधन इत्यादी विषयासह विशेष बालसाहित्याचाही समावेश आहे. अशा साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसह सर्व वयोगटाला वाचनाची आवड निर्माण होण्याबरोबरच त्यांचे ज्ञान, विचारक्षमता आणि वाचनसंस्कृती अधिक समृद्ध होण्यास निश्चितच मदत होणार असल्याचे सावरकर मंडळाचे कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे यांनी सांगितले. या मेळ्याचे उद्घाटन बुधवार दि.७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता महापौर रवि लांडगे यांचे हस्ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून यावेळी उपमहापौर, स्थानिक लोकप्रतिनिधी, मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मेळ्यात गुरुवार दि.८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता नाटकवाला पुस्तकाचे अभिवाचन, दि.९ ऑक्टोबर रोजी सायं.६.३० वाजता पुस्तक प्रकाशन सोहळा तर ७ वाजता साहित्यिक संवाद, दि.१० ऑक्टोबर रोजी अभिवाचन, सौहार्द स्लाईड शो, कलावंत संवाद आदी कार्यक्रम होणार आहे. यामध्ये अनेक साहित्यिक, कलावंत, मान्यवर सहभागी होणार आहेत. सदर पुस्तक मेळा ८, ९ व १० ऑक्टोबर रोज सकाळी ९.३० ते रात्री ८.३० पर्यंत सर्वांसाठी खुला असून या पुस्तक जास्तीत जास्त नागरिकांनी, साहित्य प्रेमींनी भेट द्यावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
