कामगार हित: मुख्यमंत्र्यांसोबत भारतीय मजदूर संघ प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक

Share this News

मुंबई, दि.५ ऑगस्ट २०२६ (सिटीनामा वृत्तसेवा)

भारतीय मजदूर संघाच्या (BMS) प्रतिनिधी मंडळाची
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत ‘वर्षा’ शासकीय निवासस्थान, मलबार हिल, मुंबई येथे दि.५ ऑगस्ट रोजी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

या बैठकीत गत १६ एप्रिल रोजी भारतीय मजदूर संघाद्वारे काढण्यात आलेल्या मोर्चाच्या निवेदनावर सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली. मजदूर संघाच्या विविध मागण्यांवर विचार करण्यासाठी लवकरच एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.


बैठकीतील प्रमुख चर्चा आणि मागण्या:

नवीन कामगार कायदे (लेबर कोड): बैठकीत भारतीय मजदूर संघाची लेबर कोडविषयीची भूमिका सविस्तरपणे मांडण्यात आली. या लेबर कोडमधील कामगार विरोधी तरतुदी रद्द कराव्यात आणि जे कामगार या कायद्याच्या कक्षेतून बाहेर जात आहेत, त्यांच्यासाठी एक स्वतंत्र कायदा तयार करण्यात यावा, अशी आग्रही विनंती करण्यात आली.                      प्रमुख मागण्या:
◦ राज्यात ESI (कामगार राज्य विमा) योजना अत्यंत प्रभावीपणे राबवावी.
◦ बोनस मर्यादा वाढवून ४२,००० रुपये करावी.
◦ राज्य सरकार अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांसाठी हरियाणा पॅटर्न लागू करावा.
◦ कामगार कपात नुकसान भरपाई ६० दिवस करावी.
◦ EPS पेन्शनधारकांना २,००० रुपये पेन्शन देण्यात यावी.
◦ विश्वकर्मा जयंती अधिकृतपणे शासकीय सण म्हणून घोषित करावी.
◦ विडी कामगारांना किमान वेतन देण्यात यावे.
◦ राज्यातील कामगार विषयक समित्या व मंडळ त्वरित स्थापन करा त्यात BMS ला योग्य प्रतिनिधीत्व द्या.
◦ माथाडी आणि सुरक्षा रक्षक मंडळातील कोर्ट केसेस दिवाणी न्यायालयाऐवजी (Civil Court) कामगार न्यायालयातच चालवण्याबाबत आवश्यक तो बदल करावा.
◦ तसेच घरेलु कामगार, बांधकाम, आशा सेविका, फेरीवाले, अंगणवाडी सेविका, वीज कामगार महासंघ, वीज कंत्राटी कामगार, एअरपोर्ट टॅक्सी चालक, इंडियन एअरलाइन रोजंदारी कामगार, लिपिक संघ, एसटी महामंडळ, सुरक्षा रक्षक यांच्यासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पेन्शन, बचत गट संस्था निधी आणि मेट्रो कामगार आदी विविध क्षेत्रातील प्रश्नांबाबत स्वतंत्र बैठका घेण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

    खालील मागण्यांवर शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे भारतीय मजदूर संघातर्फे सांगण्यात आले आहे.

    माननीय मुख्यमंत्र्यांनी अत्यंत सकारात्मक वातावरणात झालेल्या या चर्चेदरम्यान खालीलप्रमाणे आश्वासने दिली:

    • बोनस मर्यादा ४२००० रुपये करण्याबाबत गांभीर्याने विचार केला जाईल.
    • कामगार राज्य विमा योजनेबाबत (ESI) लवकरच एक स्वतंत्र बैठक आयोजित केली जाईल.
    • विश्वकर्मा जयंती आणि इतर मुद्द्यांवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल.
    • शासन स्तरावर अंतर्गत बैठक घेऊन भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींसोबत लवकरच पुन्हा चर्चा केली जाईल.
    • वीज उद्योगातील प्रश्नांवरही लवकरच स्वतंत्र बैठक घेतली जाईल.

    या बैठकीस भारतीय मजदूर संघाच्या वतीने अखिल भारतीय सेक्रेटरी ॲड. अनिल ढुमणे, प्रदेश महामंत्री किरण मिलगिर, विदर्भ महामंत्री गजानन गटलेवार आणि सह क्षेत्र संघटन मंत्री मोहन येणुरे उपस्थित होते. तसेच, शासनाच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, महेश पोहनेकर व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते अशी माहिती भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेश महामंत्री किरण मिलगिर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *