निगडी / पुणे दि.२८ एप्रिल (सिटीनामा वृत्तसेवा)
पिंपरी चिंचवड शहरातील विविध कलाकारांच्या सादरीकरणाने ग.दि.माडगूळकर सभागृहातील रसिक प्रेक्षक भारावून गेले निमित्य होते अभिव्यक्ती कला महोत्सवाचे.
संस्कार भारती पश्चिम प्रांत, पिंपरी-चिंचवड समितीच्या वतीने शनिवार दि.२५ व रविवार दि. २६ एप्रिल २०२६ रोजी अभिव्यक्ती कला महोत्सव उत्साहात संपन्न झाला.
सुप्रसिद्ध सिने, नाट्य अभिनेते सुनील बर्वे, पद्मश्री गिरीशजी प्रभुणे, सतीश कुलकर्णी, विनायक माने, मुकुंद कुलकर्णी यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
संस्कार भारती पश्चिम प्रांत पिंपरी चिंचवड समितीचे अध्यक्ष डॉ. पं. नंदकिशोर कपोते यांनी सर्वांचे स्वागत केले. तर सचिव सौ. लीना आढाव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाच्या सुरवातील सौ. आसावरी बर्वे यांनी संस्कार भारतीचे ध्येयगीत सादर केले.

दर्शनी भागात सौ.अनिता रोकडे व सौ.सुनीता कुलकर्णी ह्यांनी सुरेख रांगोळी रेखाटली. नाट्यगृहाच्या आर्ट गॅलरीमध्ये जेष्ठ व श्रेष्ठ चित्रकार गुरुवर्य रामकृष्ण कांबळे, घनश्याम देशमुख व आंररराष्ट्रीय सुप्रसिध्द चित्रकार व शिल्पकार प्रमोद कांबळे, चित्रकार कविता साळुंके, चित्रकार व व्यंगचित्रकार, बोलक्या रेषांचे निर्माते घनश्याम देशमुख, आंरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रकार सुरभी गुळवेलकर, सुप्रसिध्द चित्रकार, शिल्पकार श्री. उत्तम साठे, युवा चित्रकार दिग्विजय कुंभार, युवा चित्रकार अमित ढाणे या चित्रकारांच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन केले होते. या महोत्सवाचा अविभाज्य घटक असलेल्या चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेक स्थानिक कलाकारांना आपली अभिव्यक्ती प्रदर्शित करता आली. व या सुप्रसिध्द चित्रकारांकडून आपल्या कलाकृतीबाबत चर्चा करण्याची संधी मिळाली.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सुप्रसिध्द स्थापत्य ओजस हिराणी यांनी भारतीय मंदिर स्थापत्य व विमर्श या विषयावर आपले सखोल ज्ञान व्याख्यानाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर प्रस्तुत केले.
दुपारी संजीवनी महिला शाहीरी पथकाने महाराष्ट्राची लोककला हा कार्यक्रम सादर झाला. ज्यामध्ये १६ हून अधिक महिला कलाकारांनी सादरीकरण केले.
पिंपरी चिंचवड परिसरातील बाराहून अधिक नृत्य विद्यालयांनी एकत्र येत नृत्यपंढरी हा कार्यक्रम प्रस्तुत केला. जागतिक नृत्य दिवसाच्या निमित्ताने आणि संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या कार्याला मानवंदना देत तब्बल १०० हुन अधिक कलाकारांनी विविध नृत्य प्रकार माध्यमातून संत रचना सादर केल्या.
यानंतर श्रद्धा हर्डीकर-शिंदे यांचा कथक नृत्य कार्यक्रम झाला. तर सायंकाळच्या सत्राची सुरुवात डॉ. पं. नंदकिशोर कपोते यांच्या कथक नृत्याने झाली. पंडित मुकुंदराज देव यांनी त्यांना तबल्यावरती साथसंगत केली व रसिकांनी तबला आणि घुंगरू यांची जुगलबंदी सुद्धा अनुभवली. पं. संजय गरुड यांनी गायन साथ केली. तर अलका गुजर-सतार, अझरुद्दीन शेख-बासरी व ज्ञानेश कोकाटे यांनी पखवाजावर साथसंगत केली. प्रथम दिवसाची सांगता पंडित कैवल्यकुमार गुरव यांच्या शास्त्रीय गायनाने, त्यांना संतोष साळवे-तबला व गंगाधर शिंदे-हार्मोनियम यांनी साथसंगत केली.
रविवार दि.२६ एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात उपमहापौर सौ.शर्मिलाताई बाबर व ज्येष्ठ नगरसेविका सौ.शैलजाताई मोरे ह्यांनी कार्यक्रमाला भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. दि.२६ एप्रिल रोजी दुसऱ्या दिवसाची सुरवात गणेश वंदनेने अत्यंत उत्साहात झाली तर निलेश शिंदे व शर्मिला शिंदे यांनी ध्येय गीताचे सादरीकरण केले. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला डॉ. भावार्थ देखणे यांचे बहुरूपी भारुड सादर झाले. संजय नलगे यांनी आपल्या अभिनयाने भावार्थ देखणे यांना साथ दिली तर डॉ.पूजा देखणे व सहकाऱ्यांनी संगीतसाथ केली
रंगमुद्रा थिएटर फाउंडेशन प्रस्तुत आठवणींचा गाव या कार्यक्रमाने सर्वांची मने जिंकली. ज्यामध्ये नरेंद्र आमले, प्रशांत कुलकर्णी, साक्षी देवरे, सौ. स्मिता कुलकर्णी व वाणीश्री कोल्हटकर यांनी अभिवाचनातून स्त्रीच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यातील भावविश्व सादर केले.
संस्कार भारती पिंपरी चिंचवड समितीच्या संगीत विधेच्या कलासाधकांनी आशा भोसले यांना त्यांच्या अजरामर गीतांच्या सादरीकरणाने श्रद्धांजली अर्पण केली दुपारच्या सत्राची सुरुवात किराणा घराण्याचे जेष्ठ गायक पंडित सुधाकर चव्हाण यांच्या गायनाने झाली. संध्याकाळी पद्मश्री संध्या पुरेचा यांच्या विद्यार्थिनींनी भरतनाट्यम नृत्य सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
या कार्यक्रमानंतर, डॉ. संध्या पुरेचा यांच्या हस्ते नृत्य पंढरी या कार्यक्रमातील सहभागी नृत्य अकादमी आणि त्यांच्या गुरूंचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी डॉ. नंदकिशोर कपोते, लीना आढाव यांच्यासह शाहीर हेमंत राजे मावळे, मिलिंद भोळे आणि अभय पटवर्धन हे उपस्थित होते.
या पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या कार्यक्रमांमध्ये पद्मश्री पं. रोणू मजुमदार यांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला आणि माझे माहेर पंढरी या गाण्याने आपल्या बासरी वादनाचा शेवट केला. समीर सूर्यवंशी यांनी त्यांना तबल्यावरती साथ संगत केली. तर अभिव्यक्ती कला महोत्सवाचा शेवट अपर्णा चोथे यांच्या ‘त्या तिघी’ या नाटकाने झाला. स्वा.सावरकरांच्या घराण्यातील महिला शक्तीच्या तोंडून त्यांचा प्रवास या नाटकाद्वारे उलगडण्यात आला.
प्रफुल्ल भिष्णुरकर, नरेंद्र आमले, संजय चांदगुडे, सुयश कुलकर्णी, यांनी महोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. आकाश थिटे, सौ. स्मिता कुलकर्णी व सौ. आसावरी बर्वे, यांनी महोत्सवाचे निवेदन केले. तर गंगाधर शिंदे यांनी संपूर्ण वंदे मातरम् सादर केले.

