चिंचवड / पुणे दि.८ सप्टेंबर (सिटीनामा वृत्तसेवा)
‘कोणत्याही विषयाच्या मूलभूत संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगताना त्यांची व्यावहारिक जीवनातील उदाहरणांसोबत सांगड घालता आली तर तो विषय विद्यार्थ्यांच्या आवडीचा होतो’ असे मत बा. रा. घोलप विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक प्रा. विलास वाळके यांनी शाहीर योगेश लोककला रंगमंच, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे व्यक्त केले.
५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीने आयोजित केलेल्या शिक्षक सन्मान सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. विलास वाळके बोलत होते. यावेळी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष व पुनरुत्थान समरसता गुरुकुलमचे संस्थापक पद्मश्री गिरीश प्रभुणे, समितीचे शिक्षण विभाग प्रमुख प्रा. दिगंबर ढोकले, निवृत्त मुख्याध्यापक व इतिहास अभ्यासक श्रीकांत चौगुले तसेच समितीच्या सर्व शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि गुरुकुलमचे विद्यार्थी उपस्थित होते.
मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन करून शिक्षणतज्ज्ञ डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अभिवादन करण्यात आले.
पुनरुत्थान समरसता गुरुकुलमच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीताने मान्यवरांचे स्वागत केले. पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी, नदी ज्याप्रमाणे तिच्या काठावरील प्रदेश सुजलाम् सुफलाम् समृद्ध करते त्याप्रमाणे शिक्षकाने देखील आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना ज्ञान व विविध कौशल्याने समृद्ध करावे. वर्गातील शेवटच्या विद्यार्थ्याच्या मनापर्यंत शिक्षकाने पोहोचले पाहिजे असे आवाहन केले. श्रीकांत चौगुले यांनी, थोर शिक्षणतज्ज्ञ डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबरोबरच ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ जे. पी. नाईक यांचीदेखील आज जयंती असल्याने या दोन्ही महान शिक्षणतज्ञांच्या विचारांची उजळणी आपण वारंवार केली पाहिजे, असे मत व्यक्त केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी प्रास्ताविकातून श्रीकृष्ण जयंती, संत ज्ञानेश्वरमाउली जयंती व शिक्षक दिन अशा तिहेरी कार्यक्रमांची सांगड घालून आजचा दिवस आत्मचिंतनाचा,
स्वयंमूल्यमापनचा आहे, असे मत मांडले. खिंवसरा पाटील विद्यामंदिरच्या सहशिक्षिका ऐश्वर्या गायकवाड यांनी, एआय, गुगल यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाने जगभरातील ज्ञानाचे दरवाजे उघडले असले तरी मिळालेल्या ज्ञानाचा, माहितीचा योग्य सदुपयोग करण्याचे संस्कार शिक्षकच विद्यार्थ्यांवर करू शकतो असे मनोगत व्यक्त केले; तर विद्यार्थी आईमध्ये शिक्षिकेला व शिक्षिकेमध्ये आईला बघत असतात म्हणूनच शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे असे मत लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालयाच्या सहशिक्षिका मनीषा वाघ यांनी व्यक्त केले. उच्च माध्यमिक विद्यालयाचे सहशिक्षक संतोष साठे यांनी युवाशक्ती व त्यांच्यातील ऊर्जा यांना योग्य दिशेने नेण्याचे कार्य करणार्या शिक्षकवृंदाना अभिवादन केले.
पुनरुत्थान समरसता गुरुकुलमचे आचार्य मारुती वाघमारे यांनी गुरुकुलम् मधील विद्यार्थ्यांमुळे मी घडत आहे कारण या मुलांमध्ये उपजतच विविध कौशल्ये आहेत अशी कृतज्ञता विद्यार्थ्यांप्रति व्यक्त केली. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रमेश पतंगे लिखित ‘स…संविधानाचा’ हे पुस्तक, तुळशीचे रोप व चाफ्याचे पुष्प देऊन सर्व शिक्षकवृंदाचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुकुलमच्या आचार्या अश्विनी ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाची संपूर्ण व्यवस्था पुनरुत्थान समरसता गुरुकुलमचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अतिशय उत्तम रीतीने केलेली होती. कार्यक्रम संयोजनात संस्थेचे व्यवस्थापक अतुल आडे, मार्गदर्शक रोहित शिंदे, प्राजक्ता कदम, किरण गायकवाड यांनी पुढाकार घेतला. संपूर्ण वंदे मातरम् गायनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
