निगडी / पुणे दि. १८ ऑगस्ट (सिटीनामा वृत्तसेवा)
आर्मी पब्लिक स्कूल, देहूरोडच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील गणेश तलाव परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान, निगडी प्राधिकरण तसेच चिंचवड येथील मोरया गोसावी घाट व मंदिर परिसरात आज जलसंवर्धन व स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले. या अभियानात ६० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वच्छता व जलसंवर्धनाचा प्रभावी संदेश दिला.

या अभियानांतर्गत गणेश तलाव, चिंचवड येथील मोरया गोसावी महाराज मंदिर परिसर आदी ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वच्छता केली. तसेच ठीक ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून पाणी व स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवून जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यानी सीड बॉल आणि सीड पेपर देऊन झाडे लावा असा संदेश पोहोचवला विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गणेश तलाव परिसरातील अभियानास पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर सौ. शर्मिलाताई बाबर यांनी उपस्थित राहून प्रत्यक्ष सहभाग घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. तसेच चिंचवड येथील अभियानात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते नगरसेवक भाऊसाहेब भोईर आणि चिंचवडचे नगरसेवक सुरेश भोईर यांनीही मुलांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ह्या प्रसंगी वसुंधरा विषयी शपथ सर्वांनी घेतली
या उपक्रमासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच मोरया गोसावी मंदिर ट्रस्टचे मंदार देव महाराज यांचे मोलाचे सहकार्य लाभले. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी साबळे , मुकेश जगताप, संतोष सुर्वे तसेच महानगरपालिकेच्या इतर कर्मचारी वर्गाने अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष सहकार्य केले.
या अभियानात आर्मी पब्लिक स्कूल, देहूरोडचे शिक्षक लीना आढाव, अनिता चटर्जी, मनिषा खचराने, स्वप्नील शिंदे आणि रोहित साळवी हे उपस्थित होते ह्या सर्व उपक्रमासाठी मुख्याध्यापिका पारोमिता नंदी, उपमुख्याध्यापिका मेघा शिदोरे यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम पार पडला.
विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून राबविण्यात आलेल्या या अभियानातून परिसर स्वच्छतेसोबतच “स्वच्छता हीच सेवा” आणि “पाणी वाचवा, जीवन वाचवा” हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आल्याची माहिती शाळेतर्फे देण्यात आली.
