पिंपरी चिंचवड दि.१८ जुलै (सिटीनामा वृत्तसेवा)
“लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे हे केवळ एका समाजाचे नेते किंवा साहित्यिक नसून संपूर्ण राष्ट्राच्या सामाजिक चेतनेचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या साहित्याने आणि विचारांनी समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक न्याय आणि राष्ट्रनिर्मितीचा अखंड संदेश दिला आहे. त्यामुळे हिंदू समाजातील सर्व जाती-जमातींनी जातीय सीमांच्या पलीकडे जाऊन अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि पुण्यतिथी संयुक्तपणे साजरी करणे ही आजच्या काळाची सामाजिक आणि राष्ट्रीय गरज आहे. अण्णाभाऊंचे स्मरण केवळ औपचारिक अभिवादनापुरते मर्यादित न राहता, ते सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक समन्वय आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रभावी प्रतीक बनले पाहिजे. सर्व समाजघटकांनी एकत्र येऊन त्यांच्या कार्याला अभिवादन केले, तर समरस, संघटित आणि सशक्त भारताच्या निर्मितीला निश्चितच नवी दिशा मिळेल,” असे प्रतिपादन समरसता गतिविधी, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संयोजक श्री. मुकुंद आफळे यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे अभिवादन सभा’ या कार्यक्रमात निगडी येथे ते त्यांनी भुमिका मांडली.यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर, समरसता गतिविघी प्रांत सहसंयोजक विलासराव लांडगे, नगरसेविका अनुराधा गोरखे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष गणेश अवघडे, जेजुरी देवस्थानचे विश्वस्त अनिल सौंदडे, प्रांत मंडळाचे सदस्य डॉ. धनंजय भिसे, धनंजय खुडे तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील भिसे यांनी प्रभावीपणे केले, तर युवराज दाखले यांनी उपस्थितांचे आभार मानले.अभिवादन सभेत अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक कार्य आणि राष्ट्रनिष्ठ विचारांचा गौरव करण्यात आला. विविध समाजघटकांतील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे सामाजिक समरसता, ऐक्य आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश अधिक दृढपणे अधोरेखित झाला.
