पिंपरी / पुणे दि.२८ जून (सिटीनामा वृत्तसेवा)
पिंपरी-चिंचवड येथील एम्पायर इस्टेटमध्ये सकल हिंदू समाज तसेच विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा अर्थात हिंदू साम्राज्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या निमित्ताने महिलांसाठी रांगोळी स्पर्धा तर लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य, किल्ले आणि हिंदवी स्वराज्याची संकल्पना आपल्या कलाकृतींमधून साकारली.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरलेली पालखी मिरवणूक एम्पायर इस्टेट परिसरातून मोठ्या उत्साहात काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि शिवरायांच्या जयघोषात नागरिकांसह शिवरायांच्या वेशभूषेतील चिमुकल्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना सात पवित्र नद्यांच्या जलाने अभिषेक करून ऐतिहासिक परंपरेनुसार राज्याभिषेक सोहळा संपन्न करण्यात आला.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ज्ञानेश्वर (माऊली) पठाडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आदर्श आचरणात आणणे हेच त्यांना केलेले खरे अभिवादन असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले. तसेच मिलिंदराव कुलकर्णी यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू अस्मिता आणि हिंदवी स्वराज्याचा गौरव जागविणारा हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध नियोजनात संपन्न झाला.
