कीर्तनकारांची बदनामी करणाऱ्या लवांडेंना अटक करापुणे जिल्ह्यासह राज्यभर संतापाची लाट; गुन्हे दाखल करण्याची मागणी

Share this News

पुणे दि. १४ मे (सिटीनामा वृत्तसेवा)
वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकारांचा ‘घुसखोर’ असा उल्लेख करून अवमान करणारे राजकीय कार्यकर्ते विकास लवांडे यांच्या विरोधात वारकरी समाज आक्रमक झाला आहे. लवांडे यांनी वारकऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावून समाजात वैमनस्य निर्माण केल्याचा आरोप करत, त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी पुणे शहर, जिल्ह्यासह राज्यभरात करण्यात आली आहे.

विश्व हिंदू परिषद आणि वारकरी संप्रदायाच्या वतीने पुणे शहरातील स्वारगेट, विश्रामबाग, फरासखाना, लष्कर, खडक, येरवडा आणि वाघोली-वडगावशेरी यांसह विविध पोलीस ठाण्यांत गुरुवारी निवेदने देण्यात आली. “लवांडे यांनी जाणीवपूर्वक ज्येष्ठ कीर्तनकारांची बदनामी केली असून, त्यांच्या वक्तव्याचे व्हिडिओ आणि ऑडिओ पुरावे तपासून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी,” अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. “सामाजिक शांतता बिघडवण्याच्या हेतूनेच वारकरी संप्रदायावर चिखलफेक केली जात आहे. पोलीस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.”, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

-पिंपरी-चिंचवड आणि बारामतीतही पडसाद :
पिंपरी-चिंचवड जिल्ह्यात चिखली, भोसरी एमआयडीसी, भोसरी, रावेत, हिंजवडी, चिंचवड आणि संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात निवेदने देण्यात आली. बारामती येथे प्रांताधिकारी आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देताना वारकरी व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. “संप्रदायाचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तींना वेळीच चाप लावा,” असा इशारा यावेळी देण्यात आला.

राज्यभर आंदोलनाचे लोण

पुण्यासोबतच नाशिक, कोल्हापूर, सातारा, नगर आणि सोलापूर यांसारख्या प्रमुख शहरांमध्येही निवेदने देऊन लवांडे यांच्या अटकेची मागणी लावून धरण्यात आली आहे. संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकारांसोबत विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने वारकरी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *