विश्वकर्मा सोशल वेलफेअर समाजभूषण पुरस्कार सोहळा उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती

Share this News

पुणे दि.८ सप्टेंबर (सिटीनामा वृत्तसेवा)

विश्वकर्मा सोशल वेलफेअर फाउंडेशन ट्रस्ट पुणे आयोजित विद्यार्थी गुणगौरव आणि समाजभूषण पुरस्कार २०२६ दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, पुणे येथे उत्साहात संपन्न झाला.

विश्वकर्मा सोशल वेलफेअर फाउंडेशन ट्रस्ट सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी अग्रगण्य संस्था असून संस्थेतर्फे दरवर्षी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन केल्या जाते.

यावर्षीच्या नुकत्याच संपन्न झालेल्या या सोहळ्यात सर्व ज्ञाती समाजातील सुमारे ६५ दहावी,बारावी तसेच १० विशेष उल्लेखनीय कार्य, ८ विशेष प्राविण्य, ८ उच्च शिक्षित अश्या गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा यथोचित गुणगौरव करण्यात आला. याच बरोबर विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तिमत्त्वांना विश्वकर्मा पुरस्कार – समाज भूषण सन्मानाने गौरविण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सतार वादक पंडित रवीजी चारी मुंबई – तंत्रीकार भूषण (सतार), आनंदजी मेस्त्री सिंधुदुर्ग- समाज भूषण , सुश्री वीणा चारी- महिला विभूषण, अभिजित भालेराव सिन्नर- क्रीडा भूषण , सुनीलजी पावले अहिल्यानगर- समाज भूषण ,पंडित नंदकिशोर कपोते यांचे शिष्य कथ्थक नृत्यकार मिलिंदकुमार तसेच सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे दत्तात्रय जाधव आणि शिल्पकार अश्विनी कुदळे यांना विशेष उल्लेखनीय कार्य सन्मानाने गौरविण्यात आले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे टीपीओ आणि डीन डॉ.शीतलकुमार रावंदळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. रावंदळे यांनी विद्यार्थ्यांना करिअर व संधी याविषयी अनमोल मार्गदर्शन केले. समुपदेशक डॉ.मयुरेश डंके यांनी आजची कुटुंब व्यवस्था व समस्या यावर प्रबोधन करीत आजच्या कुटुंबात संवाद, चर्चा, एकत्रित भोजन याचा अभाव हे मूळ असल्याचे नमूद केले. पंडित रवीजी चारी यांनी समाजासाठी मी येथे आलो. प्रत्येकाने समाज, देशाप्रती आत्मियता बाळगत कार्य केले पाहिजे असा संदेश दिला. अभिजितजी भालेराव सिन्नर यांनी काश्मीर ते कन्याकुमारी अशी दौड करीत विश्व रेकॉर्ड केले. गिनीज बुक व इंटरनॅशनल बुक्स ऑफ रेकॉर्ड यांनी त्याची दखल घेत त्यांचा रेकॉर्ड बुक मध्ये समावेश केला आहे.ऑक्टोबर २०२६ मध्ये भारत-पाकिस्तान अशी ५००० किमी ते धावणार आहेत.

या सोहळ्यात आंतरराष्ट्रीय सतार वादक पंडित रवीजी चारी यांचे सतार वादन तसेच मिलिंदकुमार आणि त्यांच्या शिष्या याचे कथ्थक नृत्य सादरीकरणाने उपस्थित मंत्रमुग्ध झाले.

संस्थेचे विश्वस्त,संस्थापक सदस्य विवेकानंद निर्मला पांडुरंग सुतार यांनी प्रास्ताविक केले तसेच मान्यवर, उपस्थितांचे आभार मानून संस्थेचे हितचिंतक, देणगीदारांचे ऋण व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.आसावरी बर्वे यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. यशस्वितेसाठी
विश्वकर्मा सोशल वेलफेअर फौंडेशन ट्रस्टच्या सर्व सदस्य, विश्वस्तांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *