सामूहिक वंदे मातरम् ने गुंजला भक्तीशक्ती परिसर

Share this News

निगडी दि.१७ ऑगस्ट (सिटीनामा वृत्तसेवा)

पिंपरी चिंचवड शहरातील भक्तीशक्ती समूहशिल्प परिसरातील प्रेरणादायी स्मारकात शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सामूहिक वंदे मातरम् गायले.

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘वंदे मातरम्’ गीताच्या १५०व्या वर्षपूर्तीनिमित्त पिंपरी चिंचवड युवान व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दि.१५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता या अनोख्या देशभक्तीपर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला विधान परिषदेचे आमदार युवा नेते अमित गोरखे, शहराचे महापौर रवि लांडगे, माजी आमदार अश्विनी जगताप, सुप्रसिद्ध अभिनेते पुष्कराज चिरपुटकर, उपमहापौर शर्मिला बाबर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे, नरेश गुप्ता यांचेसह युवान लीडर्स, प्रवाह फाऊंडेशनचे कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सिटीझन जर्नालिझम रिल स्पर्धेचे आयोजन – पोस्टर अनावरण

सामूहिक वंदे मातरम् गायनानंतर ‘सिटीझन जर्नालिझम’ या तरुणांसाठी आयोजित अनोख्या स्पर्धेची घोषणा करण्यात आली.
प्रसिद्ध सिनेअभिनेते पुष्कराज चिरपुटकर ह्यांच्या हस्ते सिटीझन जर्नालिझम रिल स्पर्धेच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला शहरातील हजारो नागरिक उपस्थित होते.
” शहरातील केवळ त्रुटींवर आधारित कंटेंट तयार न करता सकारात्मक बदलांवर रिल्स तयार कराव्या, त्या युवानच्या @युवान पीसीएमसी या इंस्टाग्राम हँडलवर शेअर कराव्यात. २५ ऑगस्टपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेमध्ये शहरातील अधिकाधिक क्लासेस आणि महाविद्यालयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उपक्रमाचे पिंपरी चिंचवडचे समन्वयक श्रेयस ठाकरे यांनी केले. या उपक्रमात शहरातील ५० हून अधिक महाविद्यालयातील सुमारे पाचशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *