मावळ दि. ९ ऑगस्ट (सिटीनामा वृत्तसेवा)
पिंपरी चिंचवड शहरातील श्री सत्यसाई सेवा समितीतर्फे पिंपरी चिंचवड शहरालगत असलेल्या मावळ भागातील शेलारवाडी येथील अमरजाई देवी मंदिरालगतच्या टेकडीवर ‘श्री सत्य साई प्रेम तरू’ वृक्षारोपण मोहीम आयोजित करण्यात आली होती.यात ‘वृक्षदायी’ संस्थेच्या सहकार्याने येथे सुमारे २०० देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.
“मानव सेवा हीच माधव सेवा” असा महत्त्वपूर्ण संदेश देणारे अध्यात्मिक गुरू भगवान श्री सत्यसाई बाबांच्या प्रेरणा व आशीर्वादातून जगभरात अध्यात्मिक व सेवाकार्याचा वैश्विक विचार देणाऱ्या श्री सत्यसाई सेवा संघटनेतर्फे संपूर्ण देशात भव्य वृक्षारोपण मोहीम राबवण्यात येत आहे.

सदर मोहिमेतील प्रत्येक झाड हे केवळ रोपण न करता त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी घेतल्या जाते. या वर्षी संपूर्ण पुणे परिसरात सुमारे ४०० झाडांची लागवड करण्यात आली आहे. मंदिर वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी विठ्ठल रुख्मिणी मंदीरे समिती पंढरपूरचे विश्वस्थ तसेच जगदगुरु संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प.शिवाजी महाराज मोरे उपस्थित होते. त्यांनी वृक्ष संवर्धन या विषयी माहिती सांगून देशी वृक्ष आणि भारतीय संस्कृती यांचे महत्व विषद करून या उपक्रमाचे कौतुक केले.
या उपक्रमात वृक्षदायी संस्थेचे संस्थेचे पदाधिकारी, स्वयंसेवक यांच्यासह व श्री सत्यसाई सेवा संघटनेचे पिंपरी चिंचवड समिती प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, व्यंकटेश जलगी, सुनील वागस्कर, मल्लिका भट यांचेसह विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, तरुण वर्ग, महिला व बहुसंख्येने युवा साई सेवक सहभागी झाले होते. भगवान श्री सत्यसाई बाबांच्या मंगल आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली.
