पुणे विद्यार्थी गृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये भाषा अकॅडमीची नवी शाखा

Share this News

पिंपरी दि.२१ जुलै (सिटीनामा वृत्तसेवा)

भाषा अकॅडमी, पिंपरी – चिंचवड तर्फे नुकतेच पुणे विद्यार्थी गृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, पुणे येथे परदेशी भाषा अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या नव्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. ही शाखा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र म्हणूनही कार्य करणार असून, परदेशी भाषा शिक्षणाच्या माध्यमातून रोजगार तसेच परदेशात उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा उपक्रम पुणे विद्यार्थी गृहाचे संचालक सुनील रेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला आहे.

पुणे विद्यार्थी गृह आणि भाषा अकॅडमी यांच्यामध्ये यापूर्वीच सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला असून, त्याचाच एक भाग म्हणून या नव्या शाखेची स्थापना करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून पुणे विद्यार्थी गृहाच्या विविध शाखा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना परदेशी भाषा शिक्षण, व्यवसायाभिमुख प्रशिक्षण, उद्योजकता विकास तसेच परदेशातील उच्च शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दोन्ही संस्था संयुक्तपणे विविध उपक्रम राबविणार आहेत. या उपक्रमाचा लाभ विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे.

या नव्या शाखेचे उद्घाटन ज्येष्ठ जर्मन भाषातज्ज्ञ डॉ. सविता केळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे विद्यार्थी गृहाचे संचालक प्रा. राजेंद्र जी. कडूसकर, पीव्हीजी’ज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटचे प्राचार्य डॉ. संदीप आर. पाटील, पीव्हीजी’ज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटचे प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी सुनील गायकवाड, युरो ग्लोबलचे व्यवस्थापकीय संचालक मयूरेश कुलकर्णी तसेच भाषा अकॅडमीच्या टीममधील संस्थापक दीपक पागे आणि प्रीती गायतोंडे, जर्मन प्रशिक्षक केतकी पागे, समुपदेशक ज्योती जंगम, भाषा अकॅडमीच्या मार्केटिंग टीममधील श्रावणी माळवदे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

भाषा अकॅडमीची ही नवी शाखा परदेशी भाषा शिक्षणाचा प्रसार करण्याच्या दिशेने उचललेले आणखी एक महत्त्वाचे पाऊल असून विद्यार्थ्यांना जागतिक शिक्षण व करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यास मदत करणार आहे. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी भाषा अकॅडमीच्या कार्याचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *