लोककलांच्या जतन-संवर्धनासाठी स्वतंत्र लोककला विद्यापीठाची गरज – कुलगुरू डॉ.आवलगावकर

Share this News

पुणे दि.२९ जून (सिटीनामा वृत्तसेवा)
जनसामान्यांच्या जीवनाचा कलात्मक आविष्कार असलेल्या लोककला आज कालबाह्य होण्याच्या उंबरठ्यावर असून महाराष्ट्राचा हा अमूल्य सांस्कृतिक ठेवा जतन, संवर्धन आणि संशोधनासाठी स्वतंत्र लोककला विद्यापीठाची स्थापना होणे ही काळाची गरज आहे,शासनाने लोककलावंतांना आणि लोककलेच्या उपासकांना एका व्यासपीठावर आणण्याची संधी उपलब्ध करून दिली, हीच ऐतिहासिक बाब आहे. हा लोककलावंतांचा पहिलाच महोत्सव ठरला आहे” असे प्रतिपादन रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि समरसता साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या समरसता लोककला संमेलनाच्या समारोप समारंभात अध्यक्षस्थानावरून त्यांनी केले.

डॉ.आवलगावकर म्हणाले,”शासनाने दरवर्षी अशा प्रकारचे लोककला संमेलन आयोजित करावे,.लोककला हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय असून भारतातील विविध राज्यांतील लोककलांना एकत्र आणण्यासाठी भविष्यात भारतीय लोककला महोत्सव आयोजित करण्याची संकल्पना त्यांनी मांडली. या उपक्रमासाठी मराठी भाषा विद्यापीठ या कार्यात सदैव सहकार्य करेल, अशी ग्वाहीही डॉ. आवलगावकर यांनी दिली.
यावेळी संमेलनाध्यक्ष पद्मश्री रघुवीर खेडकर यांनी लोककला संमेलन घेतल्याबद्दल आनंद व्यक्त करत असतानाच मुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री संमेलनाला उपस्थित राहू न शकल्याबद्दल खंत व्यक्त केली.
यावेळी व्यासपीठावर नंदेश उमप, मंगला बनसोडे, लीला गांधी, जयमाला इनामदार, सुरेखा पुणेकर, छाया व माया खुटेगावकर, स्वागताध्यक्ष धीरज घाटे,समरसता साहित्य परिषदेचे कार्यवाह डॉ. प्रसन्न पाटील आदी उपस्थित होते.संमेलनात ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करून त्यांच्या लोककला क्षेत्रातील प्रदीर्घ आणि मोलाच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. त्यांच्या अनुपस्थितीत हा सन्मान त्यांच्या भगिनी रत्ना कांबीकर यांनी स्वीकारला.संमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरल्या त्या मान्यवर लोककलावंतांच्या मनमोकळ्या मुलाखती. नंदेश उमप, रघुवीर खेडकर, मंगला बनसोडे, सुरेखा पुणेकर आणि जयमाला इनामदार यांच्या मुलाखतींमधून लोककलेचा संघर्षमय प्रवास, समृद्ध परंपरा आणि भावी वाटचाल यांचे प्रभावी दर्शन घडले.
समरसता लोककला संमेलनात लोककला, लोकसाहित्य आणि लोकपरंपरांच्या जतन, संवर्धन व विकासाच्या दृष्टीने सात महत्त्वपूर्ण ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. या ठरावांचे वाचन काशीनाथ पवार यांनी केले. उपस्थित लोककलावंत, साहित्यिक, अभ्यासक आणि रसिकांनी हात उंचावून या ठरावांना उत्स्फूर्त अनुमोदन देत त्यांना एकमुखी मान्यता दिली.समरसता लोककला साहित्य संमेलनात लोककला, लोकसाहित्य आणि लोकपरंपरांच्या जतन, संवर्धन व विकासासाठी सात महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. जिल्हास्तरावर प्रशिक्षण व संशोधन केंद्रे स्थापन करणे, उपेक्षित लोककलांना मुख्य प्रवाहात स्थान देणे, शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमात लोकसंस्कृतीचा समावेश करणे, लोककलावंतांना सामाजिक व आर्थिक सुरक्षा प्रदान करणे, लोप पावत चाललेल्या लोककलांचे डिजिटल दस्तऐवजीकरण करणे, नवोदित कलावंत व संशोधकांना प्रोत्साहन देणे आणि स्वतंत्र लोककला विद्यापीठाची स्थापना करणे, अशा प्रमुख मागण्या या ठरावांमध्ये करण्यात आल्या. या ठरावांतून लोककलावंतांचे सक्षमीकरण, लोकसंस्कृतीचे शाश्वत संवर्धन आणि समरस समाजनिर्मितीचा दृढ संकल्प व्यक्त करण्यात आला असून, शासनाने ते तातडीने अमलात आणावेत, अशी एकमुखी मागणी संमेलनात करण्यात आली.
कविसंमेलनानेही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. प्रसिद्ध रानकवी तुकाराम धांडे, ज्येष्ठ कवी वा. ना. आंधळे आणि युवा कवी कुमार चव्हाण यांच्या ओजस्वी, संवेदनशील आणि जीवनस्पर्शी कवितांनी उपस्थितांना अंतर्मुख केले.पारंपरिक वेशभूषेतील गोंधळी, वाघ्या-मुरळी, वासुदेव, भारूड, शाहिरी, लावणी, आदिवासी नृत्य, झाडीपट्टी आदी लोककलांच्या बहारदार सादरीकरणाने महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे वैभव साकार झाले. या रंगतदार लोककलादर्शनाने संपूर्ण परिसर सांस्कृतिक उत्साहाने दुमदुमून गेला आणि रसिक प्रेक्षक अक्षरशः भारावून गेले.यावेळी मा. डॉ. प्रवीण भोळे यांनी लोककलेचे सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय महत्त्व अधोरेखित करणारे अभ्यासपूर्ण चिंतन मांडले. संमेलनातील भव्य लोककला दिंडीत एक हजारांहून अधिक लोककलावंत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. तसेच, दुर्मिळ होत चाललेल्या पारंपरिक लोकवाद्यांचे वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शन हेही संमेलनाचे विशेष आकर्षण ठरले.संमेलनाचे प्रास्ताविक धनंजय खुडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय मोरे, डॉ. धनंजय भिसे आणि जितेंद्र वाईकर यांनी अत्यंत प्रभावी, अभ्यासपूर्ण आणि नेटकेपणाने पार पाडले, तर ,विविध लोककलांचे सादरीकरन करून या भव्य, वैचारिक आणि लोकसंस्कृतीच्या वैभवाने उजळून निघालेल्या संमेलनाची सांगता केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *