चिंचवड दि.२१ (सिटीनामा वृत्तसेवा)
पिंपरी – चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आपल्या सुविद्य पत्नी डॉ. आरती सूर्यवंशी यांच्यासह
क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयास भेट दिली.

अक्षय्य तृतीया आणि क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांच्या १२८ व्या स्मृतिदिनानिमित्त दि. १९ एप्रिल २०२६ रोजी क्रांतितीर्थ अर्थात क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयास सपत्नीक भेट दिली. याप्रसंगी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, कार्यवाह ॲड. सतिश गोरडे, अतुल आडे यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी, ‘आज अक्षय्य तृतीया आणि कालच्या क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त क्रांतितीर्थाला सपत्नीक भेट देण्याचा योग आला. एका प्रेरणादायी, क्रांतिकारी, राष्ट्रप्रेमी कुटुंबाच्या वाड्याला पाहून मन भारावून गेले. लहानपणी क्रांतिवीर चापेकरबंधू यांच्या बलिदानाचा जाज्वल्य इतिहास ऐकला होता, तो संग्रहालयाच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभवता आला. यासाठी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अभिनंदन करावे तितके थोडेच आहेत. या वास्तूमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देशप्रेमाची शिकवण मिळेल अशी खात्री आहे!’ अशा भावना व्यक्त केल्या; तसेच संग्रहालयाचे उर्वरित काम तातडीने पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

