थेरगाव – पिंपरी चिंचवड/ पुणे दि.११ (सिटीनामा वृत्तसेवा)
पिंपरी-चिंचवड येथील थेरगाव परिसरातील स्विस काउंटी सोसायटीमध्ये असलेल्या पावन कामेश्वर महादेव मंदिराच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त नुकतेच भव्य धार्मिक कार्यक्रम तसेच भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने कुटुंबासह उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरुवात ७ मार्च रोजी सकाळी पूजाविधीने झाली. यावेळी रुद्राभिषेक तसेच सुंदरकांड पारायण करण्यात आले. सायंकाळी गायत्री परिवाराच्या सहकार्याने भव्य कलश यात्रा काढण्यात आली. या यात्रेत सोसायटीतील सभासद उत्साहाने सहभागी झाले. त्यानंतर दिव्य दीप यज्ञ व भजन संध्या यांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी प्रखर हिंदुत्ववादी वक्ते समीर कुलकर्णी यांनी सध्या हिंदू समाजापुढे असलेली अनेक आव्हाने सांगून त्यावर उपाय म्हणजे जातीपाती विसरून सकल हिंदूंचे एकत्रीकरण असल्याचे सांगितले. आपली महान संस्कृती, परंपरा, धर्म, अध्यात्म समजून घेऊन तो वारसा पुढील पिढीला समजावून सांगितला पाहिजे, आपली जीवनपद्धती असलेला महनीय हिंदू धर्म, संस्कृती आपण जपलीच पाहिजे असे आग्रही प्रतिपादन समीर कुलकर्णी यांनी केले. ‘पंच परिवर्तन’ या विषयावर मार्गदर्शन करताना सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्वबोध आणि नागरिक कर्तव्य यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर आपले विचार मांडून उपस्थितांना प्रेरणा दिली.

कार्यक्रमासाठी गायत्री परिवार वाघोली केंद्र येथून प्रेम सारस्वत, प्रतिभा दीदी, स्वप्नील पांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. गायत्री परिवार हरिद्वार येथील गुरुवर्य सूरज सिंह महाराज यांची विशेष उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमास पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती विद्यमान नगरसेवक अभिषेक बारणे, नगरसेवक तानाजी बारणे, सौ. योगिता बारणे, सौ. मनीषा बारणे, प्रमोद पवार व कैलास बारणे तसेच परिसरातील गणमान्य नागरिक, सोसायटी सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान मातृशक्तीच्या वतीने सौ. अनुराधा कर्डिले यांनी पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृतीचा संदेश दिला.
गायत्री परिवार हरिद्वार येथील गुरुवर्य सूरजसिंह महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवस विविध आध्यात्मिक अनुष्ठान पार पडले. त्यांच्या पौरोहित्यात दिव्य दीप यज्ञ तसेच १५ कुंडीय गायत्री यज्ञ यशस्वीरीत्या संपन्न झाला.
८ मार्च रोजी सकाळी ११ कुंडीय गायत्री यज्ञाचे आयोजन करण्यात आले या यज्ञात आहुती देत विश्वशांती व समाजकल्याणासाठी प्रार्थना केली. त्यानंतर दुपारी सर्व भाविकांकरिता महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक सोनार यांनी केले तर श्रीकांत डाहाळे यांनी आभार प्रदर्शन केले. स्विस काउंटी सोसायटीतील सर्व रहिवाशांच्या सहकार्यामुळे हा सोहळा श्रद्धा, भक्ती आणि सामूहिक सहभागाच्या वातावरणात अत्यंत यशस्वीपणे संपन्न झाला.
