लोहगड – विसापूर दि.१३ (सिटीनामा वृत्तसेवा)
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंच, लोहगड घेरेवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने परंपरागत साजरा होणारा महाशिवरात्र उत्सव यावर्षी देखील रविवार दि. १५ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे
महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला रात्री ९ वाजता लोहगड येथील मारुती मंदिरात लोहगड, घेरेवाडी व भाजे येथील भजनी मंडळांच्या वतीने हरिजागर करण्यात येईल. महाशिवरात्रीच्या दिवशी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता लोहगडावरील महादेव मंदिरात तळेगाव नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोषभाऊ दाभाडे पाटील , तसेच सौ रेश्माताई राजुशेठ देवकर पंचायत समिती सदस्य कार्ला गण यांच्या हस्ते अभिषेक करण्यात येईल. सकाळी ९ वाजता लोहगड गावातून श्री शिवाजी उदय मंडळ लोहगड यांचे वतीने ढोल ताशांच्या गजरात शिवपालखीच्या भव्य मिरवणूकेचे यावेळी नियोजन करण्यात आले आहे. घरोघरी रांगोळ्या काढून महिलांच्या वतीने शिवप्रभूंच्या पालखीचे औक्षण करण्यात येईल. सुंदर फुलांनी व सडा रांगोळी काढून शिवस्मारक सजावटीसह सकाळी १० वाजता शिववंदनेने शिवस्मारकावर अभिवादन करण्यात येणार आहे. नंतर शिवपालखी लोहगडावरील शिवमंदिरात दर्शनासाठी प्रस्थान करेल. यावेळी महाप्रसादाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.
“लोहगड विसापूर मंचाचे यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष आणि लोहगड किल्ल्याचा युनेस्कोच्या वारसा स्थळांच्या यादीत समावेश असा दुग्धशर्करा योग असल्यामुळे असंख्य ग्रामस्थ, शिवभक्त व प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे व अध्यक्ष विश्वास दौंडकर यांनी दिली.
लोहगड विसापूर विकास मंचाचे अखंडित दुर्गसंवर्धन कार्याचा आढावा:
मंच, लोहगड घेरेवाडी ग्रामस्थ व भारतीय पुरातत्व विभाग यांच्या २५ वर्षांच्या संघटित प्रयत्नातून आज दिमाखात पुन्हा कात टाकून उभा राहिलेला लोहगड आपणास पहायला मिळतो. मुख्य द्वाराला बसविलेला भक्कम सागवानी दरवाजा हा महाराष्ट्रातील पहिला किल्ला म्हणून हा मान लोहगडाला जातो. पुढे मंचाच्या मागणीला आणि पाठपुराव्याला यश आले आणि शिवकालीन प्रथेनुसार गडाचे दरवाजे दररोज संध्याकाळी बंद झाल्यामुळे गडावरील अनुचित प्रकारांना आळा बसला. मंच आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने शिवमंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. लोहगडाच्या पायथ्याला भव्य शिवस्मारक उभे राहिले. मंचाच्या पाठपुराव्यामुळे लोहगडाचे तटबंदी, बुरुज, पायऱ्या, दिशादर्शक फलक इत्यादी दुर्गसंवर्धनाची कामे भारतीय पुरातत्व विभागामार्फत पूर्ण करण्यात आली.
मंचाच्या पुढाकाराने लोकसहभागातून व शासकीय निधीतून लोहगड पायथ्याला शिवस्मारक उभारण्यात आलेले आहे. यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना शिवकार्याची प्रेरणा मिळते. या शिवस्मारक परिसरामध्ये साजेशी भव्य शिवसृष्टी साकार व्हावी अशी तमाम शिवभक्तांची इच्छा असल्याची भावना याप्रसंगी सचिन टेकवडे यांनी व्यक्त केली.
